भुसावळ/जळगाव : शिक्षण सेवकपदी नियुक्तीस मान्यता देण्याबाबतचा अनुकूल अहवाल देण्याच्या मोबदल्यात दोन लाख 30 हजारांची मागणी केल्याप्रकरणी जळगाव जिल्हा परीषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरीष्ठ लिपिक योगेश अशोक खोडपे (40, रा.ममता राणे नगर, वाघ नगर, जळगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सकाळी अटक केली होती. दुसर्या दिवशी शुक्रवारी खोडपे यांना जळगाव न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
लाच मागणी भोवली
जळगावातील 35 वर्षीय तक्रारदार यांचा लहान भाऊ जळगावच्या आर.आर.विद्यालयात 2014 पासून शिक्षक या पदावर विनाअनुदानीत तत्वावर कार्यरत आहे. त्यांचे विनाअनुदानीत तत्वावरुन अनुदानीत तत्वावर शिक्षण सेवकपदी नियुक्तीस मान्यता देण्याबाबतचा अनुकूल अहवाल तयार करून पाठविण्याच्या मोबदल्यात यातील लोकसेवकांनी तक्रारदार यांच्याकडे 12 फेब्रुवारी पंचांसमक्ष लाच मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली मात्र आरोपीला संशय आल्यानंतर त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र एसीबीला लाच मागणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी सकाळीच आरोपी योगेश खोडपे यांना अटक करण्यात आली. आरोपीविरोधात गुरुवारी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी संशयीत आरोपी खोडपे यांना जळगाव न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी करीत आहेत.
एसीबीच्या रडावर अधिकारी
खोडपे यांनी अनुकूल अहवाल देण्यासाठी तब्बल दोन लाख 30 हजारांची लाच मागितल्याने या प्रकरणात आणखी काहींचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे खोडपे यांनी कुणाच्या सांगण्यावरून लाच मागितली, यापूर्वी त्यांनी अशाच पद्धत्तीने आणखी कुणाची कामे केली तसेच या प्रकरणात सहभागी असलेले नेमके अधिकारी, कर्मचारी कोण? या प्रश्नांची उकल आता पोलिस कोठडीत होणार असल्याची दाट शक्यता आहे. लाचखोरांच्या गोटात एसीबीच्या कारवाईने अस्वस्थता पसरली आहे.