जळगाव : शहरातील महाबळ परीसरात राहणार्या 53 वर्षीय विवाहितेचा जळून मृत्यू झाला तर हा मृत्यू घातपाताने झाल्याचा आरोप मयताच्या भावाने केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जयश्री बळवंत नेरे (53, रा.अनुराग स्टेट कॉलनी, महाबळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जयश्री नेरे या पती बळवंत नेरे यांच्यासह सवत भारती नेरे यांच्यासह वास्तव्यास होत्या. बळवंत नेरे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन कार्यालयात नोकरीस होते व दीड वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले. बुधवार, 2 मार्च रोजी सायंकाळी जयश्री नेरे या जळालेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांना मयत घोषीत केले. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सखोल चौकशीची मागणी
दरम्यान, मयत महिलेचा भाऊ सुजित जाधव याने आरोप केला आहे की, बहिणीला अकस्मात आग लागलेली नसून तिचा मृत्यू घातपात करून झाला आहे. जयश्री बळवंत नेरे यांचा विवाह बळवंत नेरे यांच्याशी 25 वर्षांपूर्वी झाला होता. दरम्यान लग्नानंतर दहा वर्षांपर्यत त्यांना मुलबाळ होत नसल्याने त्यांनी भारती नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. पती व दुसर्या पत्नीसह इतरांनी तिचा छळ करून तिला जिवंत जाळल्याचा आरोप सुजीत यांनी केला आहे. तिच्या पतीसह सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत विवाहितेचा भाऊ सुजित जाधव याने केली आहे.