जळगाव : शहरातील खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. मिस्तरी काम करणार्या 20 वर्षीय तरुणाच्या डोक्यात मोठा दगड टाकून अज्ञातांनी खून केल्याची घटना शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळच्या मालधक्क्याजवळील गोदामाच्या समोर मंगळवारी रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. अनिकेत गणेश गायकवाड (20, रा.राजमालती नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा
राजमालती नगरात गणेश रमेश गायकवाड हे पत्नी सारीका आणि मुले अनिकेत (मयत), विशाल यांच्यासह वास्तव्यास आहेत. गणेश गायकवाड हे सुरत रेल्वे गेटजवळ येथील माल धक्यावर हमाली काम करतात तर त्यांची दोन्ही मुले मिस्तरी काम करतात. 24 रोजी गायकवाड हे घरी आल्यानंतर त्यांना मुलगा अनिकेत हा घरी आढळला नाही व रात्री उशिरापयर्र्ंत कुटुंबियांनी त्याची वाट पाहिली मात्र तो धरी परतला नाही मात्र मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गल्लीतील अर्जुन धोबी हे पोलिसांसह आल्यानंतर त्यांनी पिंप्राळा रेल्वे गेटजवळ माल धक्क्याच्या गोदामासमोर एक मृतदेह सापडला असून तो तुमचा मुलगा अनिकेतसारखा असल्याने खातरजमा करण्यासाठी गायकवाड यांना नेले व मृतदेह पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला. या प्रकरणी गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार अज्ञातांविरोधात जळगाव शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञातांनी दगड डोक्यात मारून केला खून
पिंप्राळा रेल्वे गेटजवळील माल धक्याजवळ अनिकेत गायकवाड या तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात भला मोठा दगड टाकून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. खुनापूर्वी तरुणासोबत आरोपींनी मद्य प्राशन केले व तरुणासही पाजल्याचे बोलले जात आहे. शहर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवला आहे.