जळगाव : यावल शहरातील एस.टी.चालकाने मनस्थिती खराब झाल्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर डाऊन लाईनवर घडली. मयताच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटनंतर मयताची ओळख पटली. शिवाजी पंडित पाटील (48, यावल) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. दरम्यान, तीन महिन्यांपासून एस.टी.चा संप सुरू असताना दुसरीकडे तोडगा निघत नसल्याने कर्मचार्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. या घटनेनंतर एस.टी.कर्मचारी अधिक संतप्त झाले आहेत.
सुसाईड नोट लिहून आत्महत्या
शिवाजीनगर अमरधाम समोरील खांबा क्रमांक 420/29/अ डाऊन लाईनवर सोमवारी सकाळी 10 वाजेपूर्वी रेल्वेखाली शिवाजी पाटील यांनी झोकून देत आत्महत्या केली. रेल्वे गँगमनच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली घटनास्थळी जळगाव शहर पोलिस ठाण्याचे हवालदार करुणासागर जाधव व आरपीएफचे सुरेश मीना यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला तर मयताच्या खिशात डायरी, ओळखपत्र व सुसाईड नोट आढळली.
आत्महत्येशी कुटुंबाचा संबंध नाही
शिवाजी पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे, माझ्या आत्महत्येशी माझ्या परीवाराचा काहीही संबंध नाही, असा उल्लेख त्यांनी केला आहे. शिवाजी पाटील यांच्या आत्महत्येमुळे जळगाव जिल्ह्यात एसटी कर्मचार्यांच्या तिसर्या आत्महत्येची नोंद झाल्याने कर्मचार्यांमध्ये राज्य शासनाविषयी अधिक संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, मयत चालकाच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.