Fearing action in Jalgaon, sand tractor blows up vehicles: Five bikers injured जळगाव : महसूल व पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूकदारांची मुजोरी वाढली असून भरधाव वेगाने धावणार्या ट्रॅक्टर चालकाने कारवाईच्या भीतीपोटी रस्त्यावरील सात ते आठ वाहनांना उडविल्याची घटना खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी वाटीका आश्रमजवळ घडली. या पाच दुचाकीस्वार जखमी झाले असून तीन जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला.
अवैध वाळू वाहतुकीवर हवा अंकुश
गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरू असून नदीपात्रात महसूल किंवा पोलिसांचे पथक कारवाईसाठी जाताच वाळूचे डंपर किंवा ट्रॅक्टर कारवाईच्या भितीपोटी भरधाव वेगाने वाहने चालवितात. मंगळवारी दुपारच्या सुमारास नदीपात्रातून वाळूने भरलेले ट्रॅक्टर जळगावकडे येत असताना पोलिस ट्रॅक्टरचा पाठलाग करीत असल्याचे समजताच कारवाईच्या भितीपोटी ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने वाहन पळवित होता. याचवेळी वाटिकाश्रमजवळ चालकाने समोर चालत असलेल्या सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिली. तर एक कार वाहनावर जावून धडकली.
ट्रॅक्टर सोडून चालक पसार
ट्रॅक्टरचालकाने वाहनांना धडक दिल्यानंतर उपस्थित नागरीकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आपल्याला मारहाण होईल या भितीपोटी ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.