जळगावात तीन महिलांचे मंगळसूत्र लांबविले

0

पोलीसचौकीत कर्मचारी असतांना घडल्या घटना
20 हजारांचा मुद्देमाल लांबविला
चोरटे अल्पवयीन असल्याची पोलिसांनी वर्तविली शक्यता

जळगाव – पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बसस्थानकावर असलेल्या गर्दीचा फायदा चोरटे घेत असून गुरूवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बसमध्ये चढणार्‍या तीन विवाहितांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार घडला. दरम्यान, याप्रकरणी दोन महिलांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला तर तिसर्‍या महिलेने तक्रार देणे टाळले. विशेष म्हणजे बसस्थानकावर पोलीस चौकीत कर्मचारी कार्यरत असतानाही तिनही घटना घडल्या हे विशेष. दिवाळीच्या सुट्यानंतर बसस्थानक, रेल्वेस्थानक पुन्हा गजबजलेले आहेत. यादरम्यान गर्दी होत असल्याने चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद बसमध्ये चढताना प्रकार
औरंगाबाद येथील यशवंतनगरात राहणार्‍या सविता रविंद्र पाटील वय-29 या मुलासह गुरूवारी सकाळी जळगावहून औरंगाबाद जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या होत्या. जळगाव-औरंगाबाद बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत कुणीतरी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कापले. मंगळसूत्रातील 2 ग्रॅम वजनाच्या वाट्या आणि 1 ग्रॅम वजनाचे तीन मणी असा 8 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

चोरट्यांचे आव्हान
पोलीस अधिक्षक कार्यालयापासून बसस्थानक हाकेच्या अंतरावर आहे. त्पोलीस चौकीत कार्यरत असतानाही चोरट्यांनी मंगळसूत्र लांबविण्याची हिंमत केली. अशा प्रकारे चोरट्याने मुद्देमाल लांबवून पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले मात्र नेमके याचवेळी कॅमेरे तांत्रिक अडचणीमुळे बंद होते. दरम्यान प्रवाशांकडून पोलिसांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता चोरटे अल्पवयीन मुले असल्याची माहिती मिळाली आहे. चोरीसाठी मुलांचा वापर झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

महिलेने तक्रार देणे टाळले
जळगाव औरंगाबाद बसमध्ये चढतांना सुमनबाई (बदललेले नाव) या महिलेचेही मंगळसूत्रातील सोन्याच्या वाट्या व सोन्याचे मणी असा एैवज लांबविले. त्यांनी स्थानकातील पोलीस चौकातील कर्मचार्‍याकडे कैफियत मांडली, त्यांनी जिल्हापेठ पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर संबंधित महिलेने नाव सांगणेही टाळले व पोलिसांची डोकेदुखी नको म्हणून तक्रार देणेही टाळले.

12 हजाराचा ऐवज लांबविला
यावल तालुक्यातील साकळी येथील जिजाबाई अरूण बडगुजर (वय-42) या दिवाळी आटोपल्यानंतर बहिणीसह सकाळी रेल्वेने सुरत पँसेंजरने जळगावात आल्या. रेल्वे स्थानकाहून रिक्षाने त्या बसस्थानकावर पोहचल्या. सकाळी 9 वाजेच्या सुमारास जळगाव-यावल बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत कुणीतरी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र कापले. यावेळी मंगळसूत्रातील 3 ग्रॅम वजनाच्या वाट्या आणि 2 ग्रॅमचे मनी असा ऐवज चोरट्यांनी लांवविला. मंगळसूत्रातील इतर मणी हातावर पडल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. 12 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.