जळगावात पकडलेली 18 लाखांची देशी दारू ‘बनावटच’

0
कलमांमध्ये पोलिसांनी केली वाढ ; पाळेमुळे शोधण्यावर भर
जळगाव- जळगावाहून देशी दारूची चंद्रपूरकडे वाहतूक होत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे यांनी सापळा रचून तीन आरोपी व वाहनासह तब्बल 18 लाखांची देशी दारू पकडली होती. तपासणीत ही दारू बनावट निघाल्याने पोलिसांनी या गुन्ह्यात भादंवि 328, 468 व 420 हे अतिरीक्त कलम वाढवल्याची माहिती स्थानिक गुन्हे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली.
बनावट दारूचे धागेदोरे चंद्रपूरपर्यंत
बनावट दारूचे धागेदोरे थेट चंद्रपूरपर्यंत पोहोचले आहेत. शिवाय अटकेतील आरोपी तथा ट्रक चालक राजेंद्र सुरेश खारकर (28, वांजरी वणी, यवतमाळ), शीतल सुकदेव ब्राह्मणे (38, बल्लारशा, चंद्रपूर) व धनराज उरकुडा चापले (38,  रा.वरोरा, चंद्रपूर) या तिघांना चोपड्यातील एका लॉजवर थांबवून मुख्य आरोपीने चोपड्यात वाहन आणून दिल्याने नेमकी बनावट दारू कुठून आली? याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे. आरोपींची 19 रोजी पोलीस कोठडी संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी चंद्रपूरातील असल्याचा संशय असून त्याच्या लवकरच मुसक्या आवळू, असा विश्‍वास कुराडे यांनी व्यक्त केला.