The house of a construction businessman was broken into in Jalgaon : four lakhs worth was stolen जळगाव : जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे बांधकाम व्यवसायिकाचे बंद घर फोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण तीन लाख 88 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. ही घटना रविवार, 4 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
मोतीलाल उर्फ मुकेश श्रावण सोनवणे (52, मोहाडी, हल्ली मुक्काम इंद्रप्रस्थ कॉलनी, रोटरी भवन, जळगाव ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकाम व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांची मुले शिक्षण घेत असल्यामुळे ते जळगाव शहरात वास्तव्याला आहे. 30 नोव्हेंबर रोजी मोहाडी येथील त्यांचे घर कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. रविवार, 4 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता त्यांचा लहान भाऊ निळकंठ सोनवणे यांनी फोनद्वारे घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार मोतीलाल सोनवणे यांनी मोहाडी येथे राहत्या घरी धाव घेऊन घरात पाहणी केली असता त्यांच्या घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलेला दिसून आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
कपाटातील 50 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे व चांदीचे दागिने, शिक्के असा एकूण तीन लाख 88 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. हा प्रकार घडल्यानंतर मोतीलाल सोनवणे यांनी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.