भुसावळ/जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैधरीत्या बायोडिझेल विक्री करणार्या पंपांवर कारवाई केल्यानंतर अनधिकृत पंप काही भागात बंद झाल्यानंतर जळगावात बोलेरो वाहनातून बायोडिझेल विक्री होत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकत फातीमा नगर भागातून 69 हजार रुपये किंमतीच्या बायोडिझेलसह 14 लाख 50 हजार रुपये किंमतीची दोन वाहने जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
बोलेरोतून चोरटी डिझेल विक्री
जळगाव शहरातील फातीमा नगराजवळील ऋषीराज इंडस्ट्रीज पीव्हीसी पाईप पॉलीमर सेक्टर नंबर 119 च्या बाजुला असलेल्या मोकळ्या मैदानावर बोलेरो (क्रमांक एम.एच.19 झेड.2577) मधून अनाधिकृतपणे बायोडिझेल अवैधरीत्या एका ट्रकमध्ये टाकले जात असतानाच पोलिस पथकाने धाड टाकली. घटनास्थळावरून गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत दानिश शेख अन्वर शेख (23, रा.उमर मशीदजवळ मास्टर कॉलनी, जळगाव), ट्रक चालक शोएब खान मंजुर खान (33, रा.गणेशपुरी, साहिल किराणा समोर, मास्टर कॉलनी, जळगाव) व अली दय्यान अली अब्बास (43, रा.बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) यांना अटक करण्यात आली. संशयीताच्या ताब्यातून 68 हजार 800 रुपये किंमतीचे बायोडिझेल व ट्रकसह बोलेरो मिळून 14 लाख 50 हजार रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली. या प्रकरणी पुरवठा तपासणी अधिकारी डी.बी.जाधव यांच्या फिर्यादीनुसार जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उिनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार सुनील दामोदरे, महेश महाजन, नाईक विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, पंकज शिंदे, हेमंत पाटील, चालक हवालदार विजय चौधरी आदींनी ही कारवाई केली. या पथकाला एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमोल मोरे व त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, नाईक मुदस्सर काझी, नाईक योगेश बारी यांनी सहकार्य केले.