जळगावात ब्रॅण्डेड कंपनीच्या बनावट लोगोद्वारे कपड्यांची विक्री : लाखोंचा कपड्यांचा साठा जप्त

जळगाव : लेव्हीस ब्रॅण्डचे कपडे नसतानाही या कंपनीचा लोगो वापरून ग्राहकांची सेलद्वारे फसवणूक सुरू असल्याची माहिती कंपनीच्या अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर पोलिसात तक्रार नोंदवणण्यात आली व त्यानंतर पोलिस पथकासह छापा मारून लाखो रुपयांचे कपडे जप्त करण्यात आले. सोमवार. 25 रोजी दुपारी दोन वाजता झालेल्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, लेव्हीस ब्रॅण्डचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी गत महिनाभरापूर्वीच जळगावातील दोन विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येवून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रॉयल पॅलेसमधील छाप्याने खळबळ
जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस येथील सभागृहात भाडेतत्वावर दिल्ली येथील कपडे विक्री व्यावसायीकाने सेल लावला व त्यात नामांकीत कंपनीच्या बॅण्ड असलेले कपडे विक्रीस ठेवले होते. अल्प दरात शर्ट, टीश र्ट, जीन्स पॅन्ट, लेदर बेल्ट, परफ्यूम्स आणि सॉक्स मिळत असल्याने ग्राहकांची गर्दी उसळली होती मात्र लेव्हीस या ब्रँण्डेड कंपनीच्या लोगो लावून बनावट शर्ट, जीन्स पॅन्ट आणि सॉक्सची विक्री होत असल्याची माहिती संबंधित कंपनीचे फिल्ड एक्झीक्युटीव्ह ऑफीसर सचिन गोसावी आणि राकेश राम सावंत यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा विक्रीला आणलेला मालाची चाचपणी केली.

पोलिसात तक्रार करताच पडला छापा
लेव्हीस कंपनीचा लोगो लावून कपडे विक्री होत असल्याचे समजल्यानंतर एक्झीक्यूटीव्ह ऑफीसर यांनी रामानंदनगर पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवार, 25 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाडे, पोलिस नाईक संजय सपकाळे, प्रवीण जगदाळे यांनी छापा टाकला. यात शर्ट, जीन्स पॅन्ट आणि सॉक्स बनावट असल्याचे आढळले. त्यानंतर कारवाई करत लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.