जळगावात भरधाव डंपरने तरूणास चिरडले

0

जळगाव। शहरात महामार्गांवरील अपघातांची मालीका सुरूच आहे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास भरधाव डंपरचालकाने मोटरसायकलस्वारास जुना खेडीरोडवरील कालिंका माता मंदिराजवळ चिरडल्याची घटना घडली. या अपघातात मोटरसायकलवरील एक तरूण जागीच गतप्राण झाला तर दुसर्‍या तरूणास खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत नातेवाईक व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कडगाव येथील भुषण पुरुषोत्तम सपकाळे (वय 24) हा त्याचा मित्र नयन सुभाष पाटील (वय 23) याच्यासह विना क्रमांकाच्या मोटारसायकलीने जळगावला येत असतांना हा अपघात घडला. जुना खेडीरोडवरील कालिंका मातामंदिरापासून काही अंतरावर मागून भरधाव येणार्‍या एमएच 19 झेड 8388 क्रमांकाच्या डंपरने मोटारसायकलीस्वारांना मागून जोरदार धडक दिली. ही धडक ऐवढी भयंकर होती की, डंपरचे मागील चाक भुषणच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर नयन सुभाष पाटील यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. नागरिकांच्या मदतीने तात्काळ भुषण याचा मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला.