जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय : सुरेशदादा जैन यांची सत्ता संपुष्टात

0

57 जागांवर भाजपा विजयी ; शिवसेनेला अवघ्या 11 जागा

जळगाव – राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत अखेर भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. 71 जागांचा निकाल हाती आला असून 57 जागांवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून 11 जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले आहे तर 3 जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहे. चार जागांवर शिवेसनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपचा हा जळगावातील आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.

सुरेशदादांची सत्ता संपुष्टात
सुमारे 35 वर्षांपासून जळगाव महापालिकेवर एकछत्री अंमल असलेल्या सुरेशदादां जैन यांची सत्ता या निवडणुकीत संपुष्टात आली आहे तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे या निवडणुकीत मोठे वजन वाढले आहे. पालघर नंतर जामनेर व आता जळगाव महापालिकेत मंत्री महाजन यांच्या नेतृत्वातील सत्ता आल्याने भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

मंत्री महाजन ठरले विजयाचे शिल्पकार
यंदा खाविआ शिवसेनेच्या चिन्हावर लढले होते. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी आमदार सुरेशदादा जैन यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. अखेर गिरीश महाजन यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. दरम्यान, एमआयएमने जळगावात प्रथम खाते उघडले असून प्रभाग 18 मध्ये त्यांचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. प्रभाग 18 अमधून बागवान रियाज अहेमद, ब मधून सुन्नाबी राजीव देशमुख, 18 क मधून शेख सय्यदा युसूफ या तिनही उमेदवारांचा विजय झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादीसह काँग्रेसचा पूर्णपणे सफाया झाल्याचे दिसून आले. आगामी निवडणुकांसाठी ही निश्‍चितच धोक्याची घंटा असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.