जळगाव : शहरातील वाघ नगरातील भाजीपाला विक्रेत्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मनोज मधुकर मिस्तरी (50) असे मयताचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शहरातील वाघनगर स्टॉपजवळील रहिवासी मनोज मधुकर मिस्तरी (50) हे आपल्या कुटंबियांसह वास्तव्यास होते. ते भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दरम्यान, बुधवारी दुपारच्या सुमारास घरात कुणीही नसतांना मनोज मिस्तरी यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. मुलगा घरात आला असता त्याला आपल्या वडीलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने आरडाओरड केल्याने परीसरातील नागरीकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच रामनंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत पाठक व उमेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह खाली उतरवित तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.