जळगावात विद्यार्थ्याला चाकू दाखवत पाच हजारांची खंडणी घेतली

जळगाव : चाकूचा धाक दाखवत विद्यार्थ्याकडून पाच हजारांची खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी सोमवार, 19 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता जिल्हापेठ पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नुतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.

एकाविरोधात गुन्हा दाखल
तक्रारदार तरुण जयदीप राजेंद्र कछवा (22, रा.धाडरी, ता.जि.धुळे, हल्ली मुक्काम गांधीनगर, रोटे हॉस्पिटल समोर, जळगाव) हा शिक्षणासाठी जळगावात वास्तव्यास आहे. सोमवार, 19 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संशयीत सुनील प्रकाश खोंडे (इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) याने नूतन मराठा महाविद्यालय परीसरात येवून जयदीप कच्छवा या तरुणाला चाकू दाखवत त्याच्याकडून सुरूवातीला दीड हजार रूपये घेतले. त्यानंतर पुन्हा चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी देत त्याच्याकडून साडे तीन हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये जबरी काढून घेतले. हा प्रकार घडल्यानंतर जयदीप कच्छवा याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने सोमवारी रात्री 11 वाजता संशयित आरोपी सुशील प्रकाश कोंडे (इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय सोनार करीत आहे.