जळगाव। शेतकर्यांचा सात बारा कोरा करावा, वीज बील माफ करावे, कर्जमाफी आदी मागण्यांसाठी गुरूवारपासून सरकार विरोधात शेतकर्यांनी संप पुकारला आहे. याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीत येणार्या शेतमालाच्या आवकमध्ये पहिल्या दिवशी जाणवला नाही. तूर, उडीद, सोयाबीनचा भाव कमी होत आहे. हे भाव अजून कमी होतील या आशेवर व्यापारी असल्याने ते माल उचलत नसल्याची परिस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसली.
बाजार समितीत पोलीस बंदोबस्त
कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे व भाजीपाला यांची आवक नेहमीप्रमाणेच पाहावयास मिळाली. शेतकर्यांच्या संपाचा पहिलाच दिवस असल्याने माल आवाकचा मोठा परिणाम दिसून आला नाही. शेतकर्यांचा बंद असल्याने कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. तसेच सकाळपासूनच कर्मचार्यांना माल खरेदीसंदर्भांत सूचना देण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच सभापती प्रकाश नारखेडे हे जातीने हजर होते.
फळे, भाजीपाल्याची आवक नेहमीप्रमाणे
कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक, पुणे, खंडवा, बर्हाणपुर येथून माल येत असतो. जिल्ह्यातील स्थानिक शेतकर्यांचा माल केवळ 10 टक्के असतो. शेतकर्यांच्या संपामुळे भाजीपाला आणि दूध विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. फळे व भाजीपाला यांची आवक दैनंदिन आवकानुसार झाली. यात आंबा 35 क्विंटल, केळी 14 क्विंटल, बटाटे 300 क्विंटल, लाल कांदा 100 क्विंटल आदी फळे व भाजीपाला यांची आवक नेहमी सारखीच झाली. तसेच किसान क्रांती समितीच्या माध्यमातून शेतकर्यांनी गावतल्या गावात भाजीपाला विक्री केला. भुसावळ येथील भाजीपाला उद्या 90 टक्के बंद होईल, अशी अपेक्षा एस.बी.पाटील यांनी व्यक्त केली.
प्रशासनाच्या हस्तक्षेपाची अपेक्षा
फ शेतकर्यांचा संपाचा पहिलाच दिवस असल्याने परराज्यातील व्यापार्यांना याची कल्पना नसल्याने त्यांनी शेती माल पाठविला होता. मात्र, शेतकरी संपाच्या दुसर्या दिवशी शेतमालाची आवक कमी होऊ शकते , असे आडत्यांचे म्हणणे होते. जिल्ह्यातील शेतकरी संपाच्या मानसिकतेवर ठाम असल्याने पुढे काय घडामोडी घडतात त्या केवळ पाहात राहण्याची भूमिका व्यापार्यांनी घेतलेली दिसली. परिस्थिती चिघळली तरी शेतकर्यांचेच नुकसान होणार असल्याने संपाचा थेट फटका आपल्याला बसणार नाही या विचारातील व्यापारी निर्धास्त दिसले.
त्यामुळे महसूल प्रशासनाने हस्तक्षेप करुन बाजार समितीत होणारी आवक सुरळीत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तथापि प्रशासकीय पातळीवर मात्र , तशा काही हालचाली आज दिसत नव्हत्या. दरम्यान किसान क्रांती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 70 टक्के बाजार समितीमधील आवक थांबली आहे. शेतकर्यांनी स्वयंस्फूर्तीने संपात सहभाग नोंदविला असून कोणतेही राजकीय पाठबळ नसतांना संप यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले. या संपाचा परिणाम येत्या दोन दिवसात सामन्य नागरिकांना होणार आहे.