मुंबई। जळगाव औद्योगिक क्षेत्रालगतची महसूल विभागाची 250 एकर जमीन विस्तारासाठी संपादित करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाने तयार करावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मंत्रालयात जळगावातील जिंदा संघटना व अधिकार्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले. जिंदाचे किरण राणे, सचिन चोरडीया उपस्थित होते.
वीज अनुदान 2 रुपये करा
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांसाठी शासनाने प्रोत्साहन योजना सुरु केली होती. उद्योगांना प्रतियुनिट 2 रुपये अनुदान दिले जात होते. पण सध्या उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांना फक्त 50 पैसे अनुदान प्रतियुनिट देण्यात येत आहे. जिंदाच्या मागणीनुसार हे अनुदान पुन्हा 2 रुपये करण्याचा प्रस्ताव महावितरणने तयार करावा, असे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले. औद्योगिक भूखंड अभिहस्तांतरण पत्रासाठी मुद्रांक शुल्क विभागाकडून 22 हजार रुपये चौरस मीटर मुद्रांक शुल्क आकारले जाते. जुन्या व बंद पडलेल्या उद्योगांसाठी हे शुल्क 6 हजार प्रति चौरस मीटर करण्याची मागणी उद्योगांनी केली.
आळीपाळीने जळगावात थांबा
जळगाव, चाळीसगाव आणि भुसावळ येथील उद्योजकांना कामासाठी धुळे येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयात वारंवार जावे लागतेे. त्या अनुषंगाने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उद्योजकांच्या मागणीनुसार धुळे येथील प्रादेशिक अधिकार्यांनी धुळे आणि जळगाव येथे आलटून पालटून एक- एक आठवडा थांबावे अशा सूचना दिल्या.