जळगाव कारागृहाच्या 17 फूट उंच भिंतीवरून उडी मारून दोन कैदी पसार

0

बुधवारी भल्या पहाटेची घटना ; भिलवाडी व बोदवडचा कैदी ; स्वयंपाकासाठी बाहेर काढल्यानंतर नजर चुकवून केला पोबारा

जळगाव (प्रतिनिधी)- जिल्हा कारागृहात चोरीच्या गुन्ह्यातील दोघा संशयीत कैद्यांनी पहारेकर्‍यांची नजर चुकवून पोबारा केल्याची घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या कैद्यांनी पसार होण्यासाठी चक्क 17 ते 18 फूट उंच भिंतीवरून उड्या मारल्या. या घटनेने जिल्हा कारागृह प्रशासनाने प्रचंड खळबळ उडाली असून संशयीतांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. शेषराव सुभाष सोनवणे (28, रा.भिलवाडी, ता.जामनेर) व रवींद्र भीमा मोरे (26, रा.बोदवड) अशी पसार झालेल्या कैद्यांची नावे आहेत.

स्वयंपाकासाठी बाहेर काढल्यानंतर केला पोबारा
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपूर्वी संशयीतांना अटक केली होती तर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर बुधवार, 5 रोजी पहाटे 5.15 वाजता बॅरेकमधून त्यांना स्वयंपाक करण्यासाठी बाहेर काढण्यात आले होते. कर्मचारी बाळू बोरसे व वासुदेव सोनवणे यांच्यावर कैद्यांवर लक्ष ठेवण्याची जवाबदारी होती मात्र कैद्यांनी कर्मचार्‍यांची नजर चुकवून कारागृहाच्या 17 फूट उंच भिंतीवर चढून उड्या मारून पोबारा केला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, यापूर्वीच एका कैद्याने उंच भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याची घटना घडली होती हेदेखील विशेष !