जळगाव । खरीप हंगामाच्या पेरणीला लवकरच सुरुवात होणार आहे. यंदा पावसाळा लवकर दाखल होण्याचे संकेत असल्याने शेती कामाला वेग आला आहे. दरम्यान हंगामाला प्रारंभ होण्यापूर्वी कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी केंद्रचालकांचे प्रशिक्षण शिबिर घेतले.
या शिबिरात 1300 विक्रेत्यांनी सहभागी होते. यावेळी नियमित सूचना, प्रशिक्षणासोबत शेतकरी मासिकासंदर्भातही सक्तीच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी मधुकरी चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे पाळधी येथील साईबाबा मंदिर सभागृहात आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला कृषी अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, सुरेंद्र पाटील, मोहीम अधिकारी प्रदीप ठाकरे, अमित पाटील, डी. एम. शिंपी, इफकोचे अशोक साकळे आदी उपस्थित होते.
यावेळी विक्रेत्यांना पीओएस प्रणाली, ई-कॉस प्रणालीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. बियाणे, रासायनिक खत, कीटकनाशके यासंदर्भात विक्रेत्यांनी परवाने दर्शनी भागात लावावे, सूचना, भावफलक आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाभरातील कृषी केंद्र चालक उपस्थित होते. दरम्यान पेरणीच्या तयारीपूर्वीच बाजारपेठेत 25 बीटी कापूस वाणांना बंदी घातली आहे. गुलाबी बोंड अळीचे कारण पुढे करत कृषी संचालकांनी यापूर्वी राशी 569 या वाणावर बंदी घातली होती. त्यानंतर दुसरा आदेश काढत तब्बल 24 वाणांवर बंदी घातली आहे. या आदेशानंतर शेतकरी आणि बियाणे विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून बाजारापेठेतील गोंधळाचा थेट विक्रीवर परिणाम झाला आहे. शासनाने त्यांच्या स्तरावर बियाणेबंदीसंदर्भात कोणताही खुलासा केला नसल्याने अद्याप गोंधळ दूर झालेला नाही. या बियाण्यावरील बंदी उठेल किंवा नाही याबाबत तर्कवितर्क असून बाजारपेठेतील विक्रीवर परिणाम झाला आहे.