जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई : पाच गावठी कट्ट्यांसह चौघे जाळ्यात
वरणगावसह विदगावजवळ गोपनीय माहितीवरून कारवाई : शस्त्र तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगावसह चोपडा तालुक्यातील विदगावजवळ जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे चौघा शस्त्र तस्करांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून तब्बल पाच गावठी कट्टे व एक मॅग्झीन, सात जिवंत काडतुसे मिळून एक लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने शस्त्र तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी वरणगाव व जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपींना झाली अटक
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीजवळील उड्डाणपुलाजवळ तीन संशयीत शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी सापळा रचण्यात आला. संशयीत संजय गोपाल चंदले (47, दर्यापूर शिवार, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव), गजानन शांताराम वानखेडे (24, रा.तरोडा, ता.मुक्ताईनगर), निखील महेश चौधरी (22, रा.रनीमाळा नगर, वरणगाव, ता.भुसावळ) येताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींच्या ताब्यातून चार गावठी पिस्टल, एक मॅग्झीन व चार जिवंत काडतुस जप्त करण्यात आले तर सागर दिलीप कोळी (26, वाल्मीक मंदिराजवळ, विदगाव) यास विदगावजवळून अटक करण्यात आली. आरोपी सागरच्या ताब्यातून गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस, एक मॅग्झीन जप्त करण्यात आले.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली. सहा.निरीक्षक जालिंदर पळे, एएसआय अशोक आकार महाजन, हवालदार महेश आत्माराम महाजन, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, चालक हवालदार विजय गिरधर चौधरी आदींच्या पथकाने विदगावातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या तर पोलिस निरीक्षक अमोल देवढे, हवालदार सुनील दामोदरे, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक किशोर राठोड, रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, कॉन्स्टेबल विनोद सुभाष पाटील, चालक कॉन्स्टेबल मुरलीधर सखाराम बारी आदींनी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीजवळ तिघा शस्त्र तस्करांच्या मुसक्या आवळल्या.