जळगाव : जळगांव ग्रामीण मतदारसंघातील आदिवासी वस्त्यासाठी ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतुन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून विविध कामांसाठी 41 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आदिवासी वस्ती सुधारणेची कामे दर्जेदार पद्धतीने मुदतीच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना नामदार गुलाबराव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.
अशी असतील कामे
आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रमांतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव तालुक्यात बिलखेडा येथे आदिवासी वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे (7.50 लक्ष ) जळगांव तालुक्यातील भोकर येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे (20 लक्ष), नागझिरी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे (7.50 लक्ष), फुपनी येथे रस्ता व गटार बांधकाम करणे(3.50 लक्ष) व देवगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे (3.50 लक्ष) असे एकूण 5 आदिवासी वस्तीतील विकास कामासाठी 41 लाखाचा निधी मंजूर झाल्याने त्या-त्या भागातील नागरिकांनी ना.गुलाबराव पाटील यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले.
मुदतीत दर्जेदार कामे करा
आदिवासींच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेली सदर विविध विकास कामे मुदतीत पूर्ण करून कामे दर्जेदार पद्धतीने करा.कामांच्या दर्जाबाबत अधिकार्यांनी जागृत राहण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना ना.गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या आहेत.आदिवासींच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून वाड्या- वस्त्यातील विकास कामांसाठी कटिबध्द असल्याचेही ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
प्रशासकीय मंजुरी
यासाठी सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी यांना सदर कामे मंजूर करण्याबाबत अवगत केले होते. त्यानुसार प्रकल्प अधिकारी हिवारले यांनी प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी नुकत्याच या योजनेतून 41 लाखाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.