जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्याचा गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न

भुसावळ/जळगाव : जळगाव जिल्हा कारागृहात एका कैद्याने मध्यरात्री रूमालाने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने कारागृहात खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे (मराठे, रा.खेडी बु.॥, ता.जळगाव) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या कैद्याचे नाव आहे.

संशयीत खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात
जळगाव जिल्हा कारागृहातील बॅरेक तीनमध्ये पाच महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यात कैद असलेल्या संशयीत आरोपी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे (मराठे) हा कैद असून त्याने रविवारी मध्यरात्री लोखंडी गजाला रुमालाची दोरी करून गळ्याला फास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोबत असलेल्या कैद्याच्या लक्षात आल्याने त्याने आरडा-ओरड केली व त्याचे पाय धरून ठेवले. यावेळी जिल्हा कारागृहात रात्री गस्तीवरील जेल पोलिस शिपाई राजू ढोबाळ, नदीम शहा, गजानन राठोड, धिरज शिंदे, राजेंद्र सावकारे यांनी धाव घेऊन अमोल सोनवणे याला तत्काळ त्याला खाली उतरले व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याबाबत जेल पोलीस शिपाई राजू भवानीसिंग ढोबाळ यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.