जळगाव जिल्हा दूध संघातील अपहार : एमडी मनोज लिमयेंसह चौघांना रात्री उशिरा अटक

Four arrested including MD Manoj Limayen in case of embezzlement in district milk union जळगाव : जळगाव दूध संघातील अपहारप्रकरणी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह अनिल हरीशंकर अग्रवाल, हरी रामू पाटील, विठ्ठल रुख्मिणी एजन्सीचे मालक किशोर काशिनाथ पाटील यांना शहर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गटासाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांना अटकेची शक्यता असून सध्या दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्याआधीच अटकसत्र सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

असे आहे नेमके प्रकरण
जिल्हा दूध संघातून तुपाची परस्पर विक्री करून अपहार केल्याचा सर्वात पहिला गुन्हा सप्टेंबर महिन्यात दाखल करण्यात आला. यानंतर लिमये यांनी लोणी चोरी झाल्याबाबत तक्रार दिली होती. यानंतर आणखी दोन तक्रारी आल्या होत्या. यातील जबाबानुसार दूध संघात एकूण एक कोटी 15 लाख रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तूप चोरी प्रकरणात डेप्युटी एमडी शैलेश मोरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासक समितीची पूर्व परवानगी न घेता अठराशे रुपये किलोंचे तूप 85 रुपयांप्रमाणे विक्री करून जिल्हा दुध संघाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

एमडी लिमये यांच्यावर अपहार केल्याचा संशय
या प्रकरणात सुरुवातीला लिमये यांनी दूध संघात चोरी झाल्याची तक्रार केली होती. नंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला. दरम्यान, दुसर्‍या एका तक्रारीत एमडी लिमये यांच्यावरही अपहार केल्याचा संशय होता. त्यानुसार प्रभारी कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांची फिर्याद दिली होती. 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता दुध संघाच्या प्रशासकीय बैठकीत 1800 किलो बी ग्रेड तूप कमी दराने पूर्व परवानगी न घेता विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने मोरखडे यांनी गुन्हा दाखल केला होता.