जळगाव । राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला यशवंत पंचायतराज पुरस्कार देण्यात येत असतो. राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडून विभागनिहाय नामाकांन मागविण्यात येत असतात. त्याअनुषंगाने नाशिक विभागातुन जळगाव जिल्हा परिषदेने तर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पंचायत समितीने 2016-17 चा यशवंत पंचायतराज पुरस्कारात प्रथम क्रमांक पटकविला आहे.
नाशिक विभागातुन प्रथम येणार्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची शिफारस राज्यस्तरीय पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रशासकीय कामकाज आदीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाच जिल्हा परिषद व पाच पंचायत समितीची शिफारस करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जाते. प्रथम येणार्या जिल्हा परिषदेला 50 लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येत असते.