जळगाव जिल्ह्यातील तीन एटीएम फोडले : जामनेरसह हरीयाणातील आरोपी जाळ्यात

Two of the gang who broke ATMs with gas cutters in Jalgaon district are in the net of Jalgaon Crime Branch जळगाव : जळगाव जिल्ह्यात गॅस कटरने एटीएम फोडत धुमाकूळ घालणार्‍या टोळीतील एका सदस्याला हरीयाणा राज्यातून गुन्हे शाखेने अटक केली असून या चोर्‍यांसाठी मदत करणार्‍या जामनेरच्या इसमालाही अटक करण्यात आली. आरोपीने बोदवडसह जामनेर व नेरीतील चोरीची कबुली दिली आहेत तर टोळीतील पाच ते सात साथीदार मात्र पसार आहेत. वारीस उर्फ कालू जलालू खान (खिल्लुका, ता.हातीन, जि.पलवल, हरीयाणा) व शेख शोएब शेख रफिक (मदनी नगर, जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावेत आहेत. दरम्यान, तीन्ही गुन्ह्यांमध्ये हरीयाणातील टोळीचा सहभाग असल्याचे वृत्त ‘दैनिक जनशक्ती’ने प्रसिद्ध करून पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले व हे वृत्त आरोपीच्या अटकेने खरे ठरले आहे.

जिल्ह्यातील तीन चोर्‍यांचा उलगडा
जामनेर पोलिस ठाणे हद्दीत 43 हजार 500 तर कासोदा हद्दीत नऊ लाख 55 हजार व बोदवड शहरातून 31 लाख 10 हजार मिळून एकूण 41 लाख आठ हजार 500 रुपयांची रोकड गॅस कटरद्वारे एटीएम फोडून लांबवण्यात आली होती. गुन्हे शाखेने या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर जामनेरचे काही संशयीत हरीयाणा कापूस विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली तर काही हरीयाणा येथून जामनेरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेख शोएब शेख रफिक यास अटक करण्यात आली. संशयीताने आरोपींची नावे सांगितल्यानंतर पथकाने स्थानिक हरीयाणा पोलिसांच्या मदतीने वारीस खान यास अटक केली. आरोपींचे पाच ते सात साथीदार असून ते पसार झाले आहेत तर एक आरोपी तिहारच्या कारागृहात आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देवछे, अश्रफ शेख, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, दीपक पाटील, विनोद पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, नंदलाल पाटील, कृष्णा देशमुख, भगवान पाटील, ईश्वर पाटील, मुरलिधर पाटील, अशोक पाटील आदींच्या पथकाने केली.