जात व वैधता प्रमाणपत्राची अडचण : जिल्हाधिकार्यांकडून लवकरच निकाल !
जळगाव- जात व वैधता प्रमाणपत्र सादर न करणार्या जिल्हाभरातील तीन हजार सदस्यांवर अपात्रतेची तलवार असून या संदर्भात जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर लवकरच धाडसी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी शहरातील नियोजन भवनात 84 ग्रामपंचायत सदस्यांना नैसर्गिक न्याय तत्वावर म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली तर ज्यांनी म्हणणे मांडले नाही त्यांना सोमवार-मंगळवारपर्यंत संधी देण्यात आली आहे.
तीन हजार सदस्यांवर अपात्रतेचे संकट
लोकप्रतिनिधीने जात व वैधता प्रमाणपत्र (कास्ट अॅण्ड व्हॅलिडेटी) निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सादर केले नसेल तर त्यांना पदावरून अपात्र करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच निकाल दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील सदस्यांबाबत माहिती मागवण्यात आली होती तर त्यात सुमारे तीन हजार सदस्यांनी जात व वैधता प्रमाणपत्र दिले नसल्याची बाब पुढे आली आहे. शुक्रवारीदेखील नियोजन भवनात जिल्ह्यातील 84 सदस्यांची जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सुनावणी घेतली. सुनावणीप्रसंगी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजेंद्र भारदे, जिल्हा विधी अधिकारी अॅड.हरुल देवरे उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी यापूर्वी अमळनेरच्या 23 नगरसेवकांना अपात्र ठरवले होते तर लवकरच सदस्यांबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.