जळगाव जिल्ह्यात पीक विम्यापासून शेतकरी वंचित!

0

मुंबई । यावर्षी पीक विमा भरण्यासाठी राज्यभरात गोंधळ सुरू असताना जळगाव जिल्ह्यात मात्र गेल्या वर्षीचेच पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांना मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचेच आमदार हरिभाऊ जावळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नातून ही माहिती मिळाली असून जळगाव जिल्ह्यात केवळ 210 शेतकर्‍यांनाच विम्याची रक्कम मिळाली असल्याचे जावळे यांनी म्हटले आहे. यामुळे अनेक शेतकरी अद्यापही वंचित असून त्यांना मदत कधी मिळणार याबाबत जावळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

केवळ 210 शेतकर्‍यांनाच भरपाई!
तारांकित प्रश्नांमध्ये जावळे यांनी जळगाव जिल्ह्यातील एक लाख 70 हजार शेतकर्‍यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत 2016 साली 60 लाख रुपये भरले असल्याची माहिती देत केवळ कपाशी व तूर या पिकांचा विमा सोडून इतर पिके घेतलेल्या केवळ 210 शेतकर्‍यांना पीक विम्याची भरपाई देण्यात आली असल्याचे म्हटले आहे. जून 2017 मध्ये ही बाब निदर्शनास आली असून उर्वरित विमा देण्याबाबत शासनाने काय कारवाई केली? आणि विलंब का झाला? असा सवाल जावळे यांनी केला होता. तसेच चौकशीअंती वंचित असलेल्या उर्वरित शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देण्याबाबत काय कार्यवाही शासनाने केली आहे? असाही सवाल हरिभाऊ जावळे यांनी उपस्थित केला.

भरपाईची रक्कम बँकांकडे वर्ग
याला उत्तर देताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सदर आकडेवारी चुकीची असल्याचे सांगत जळगाव जिल्ह्यात खरीफ हंगाम 2016 मध्ये 1 लाख 86 हजार शेतकर्‍यांनी 43.62 कोटी विमा हप्ता भरला असल्याची माहिती दिली आहे. यामुळे 2.47 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. तसेच योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 9,059 पात्र शेतकर्‍यांना 4.5 कोटी नुकसान भरपाई भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत निश्चित करण्यात आली आहे, असेही सांगितले आहे. पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित बँकाकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती लेखी उत्तरात कृषिमंत्र्यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबविण्यात आली.