जळगाव जिल्ह्यात १० एप्रिलपासून होणार मोफत तांदुळ उपलब्ध

0

आजपर्यंत ६ हजार ३५८ मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये. यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते ६ एप्रिल या सहा दिवसात जळगाव जिल्ह्यातील ३ लाख ११ हजार २०७ शिधापत्रिका धारकांना तब्बल ६ हजार ३५८ मे. टन अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणार्‍या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जळगावचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी दिली आहे. माहे एप्रिल २०२० साठी अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रति कार्ड २३ किलो गहू , १ रूपये किलो दराने ज्वारी ३ किलो आणि ३ रुपये किलो दराने प्रति कार्ड ९ किलो तांदूळ दिला जात आहे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जात आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे ११ हजार ४७५ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहेत त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. १० एप्रिलपासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जुनमध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्यादराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैधमापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.