जळगाव। सोमवारी जळगाव फर्स्टच्या कार्यकर्त्यांनी डॉ. राधेश्याम चोैधरी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेत शहराचा जिव्हाळ्याचा साफसफाईचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नांना देखील चालना मिळावी अशी विनंती केली. याप्रसंगी अशफाक भाई पिन्जारी, राजेंद्र महाजन, सुभाष ठाकरे, अनिल साळुंखे, योगेश पाटील, सतीश वाणी, प्रा.विशाल पवार ,विशाल वाघ आदी उपस्थित होते.
हुडकोची कर्जफेड ,2175 गाळेधारकांचे भाड़ेकराराचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे नागरिकांच्या कराचा पैसा मुलभुत सुविधांऐवजी कर्जाच्या व्याजापोटी भरला जातो तो थांबला पाहिजे अशी मागणी केली. जळगाव जिल्हा रुग्णालयातील रिक्त असलेली वैद्यकीय अधिकार्यांची पदे तातडीने भरण्यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली. गोलाणी मार्केटनंतर बी. जे. मार्केटमध्ये सुद्धा साफसफाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. बी. जे. मार्केटसह इतर मार्केटचा साफसफाईचा प्रश्न सुद्धा हाती घेण्याची विनंती केली. यानंतर उत्पादनशुल्कचे अधीक्षक आढाव यांच्यासमोर महामार्गावरील अनेक हॉटेलमध्ये अवैध रित्या दारुची सर्रास विक्री होत असल्याचे सांगितले. त्यावर कार्यवाही व्हावी अशी विनंती केली. जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकपणे सर्व विषय हाताळण्याबाबत आश्वस्त केले.