जळगाव महानगरपालिकेतील घोटाळ्याप्रकरणी शंभर आजी-माजी नगरसेवकांवर कारवाईचे संकेत

0

19 रोजी अंतिम सुनावणी ; माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे भाकीत खरे ठरणार !

जळगाव- जळगाव महानगरपालिकेतील घोटाळ्याप्रकरणी दाखल चार याचिकांसंदर्भात गुरुवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकीलांनी बाजू मांडत तपास पूर्ण झाल्याचे सांगत या प्रकरणी घोटाळ्याच्या रकमांची ताळमेळ जुळवण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली असून तो अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले तर या खटल्याप्रकरणी खंडपीठात 19 जुलै रोजी अंतिम सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या तपासानंतर या गुन्ह्यातील संशयीतांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी जळगावातील आजी-माजी शंभर नगरसेवक कारागृहात जातील, असा गौप्यस्फोट केला होता तर हे भाकीत खरे ठरण्याची शक्यताही यानिमित्ताने वर्तवली जात आहे. महानगरपालिकेच्या तोंडावर झालेल्या घडामोडीमुळे आजी-माजी नगरसेवकांच्या गोटात मोठीच खळबळ उडाली आहे.

घोटाळ्याप्रकरणी पाच गुन्हे होते दाखल
जळगाव महानगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यासह अटलांटा, वाघूर पाईप लाईन घोटाळा, विमानतळ घोटाळा आदी पाच स्वतंत्र गुन्हे त्रयस्त तक्रारदार नरेंद्र भास्कर पाटील यांच्या तक्रारीनंतर दाखल झाले होते. घरकुल प्रकरणातील संशयीताना जामीन मिळाला असलातरी अन्य चार गुन्ह्यांमध्ये मात्र न्यायालयीन कामकाज सुरू होते. गुरुवारी खंडपीठाचे न्या.एस.एस.शिंदे व न्या.जाधव यांच्या न्यायासनासमोर खटल्याचे कामकाज चालले. पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.नामदे यांनी बाजू मांडली. चार गुन्ह्यात पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून आरोपींना अटक करणे बाकी असल्याचे सांगत तक्रारदार हे त्रयस्त इसम असून घोटाळ्याच्या रकमा टॅली करण्यासाठी काळे अ‍ॅण्ड सन्सला एजन्सी नेमण्यात आल्याचे सांगून या एजन्सीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अ‍ॅड.नामदे म्हणाले. तक्रारदार नरेंद्र भास्करराव पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड.एस.पी.ब्रह्मे काम पाहत आहेत.

तर माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे सूचक विधान खरे ठरणार !
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेचे शंभर आजी-माजी नगरसेवक जेलमध्ये जातील, असा गौप्यस्फोट करीत हे गुपित मुख्यमंत्र्यांना व आपल्याला माहित असल्याचे सांगितले होते. 30 जुलै रोजी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होत असताना निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या घडामोडीमुळे आजी-माजी नगरसेवकांच्या तंबूत घबराट निर्माण झाली आहे. संशयीतांना अटक झाल्यास जळगावातील राजकीय समीकरणेदेखील बदलतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.