जळगाव महापालिका आयुक्तांसह विभागीय आयुक्तांविरुद्ध खंडपीठाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका

0

आज खंडपीठात सुनावणीची शक्यता : जळगाव महानगरपालिका नगरसेवक एक कोटी 16 लाख वसुली प्रकरण

जळगाव- जळगाव महानगरपालिकेतील विविध घोटाळ्यांप्रकरणी तत्कालीन 55 नगरसेवकांकडे एक कोटी 16 लाखांची थकबाकी असतानाही त्या संदर्भात कारवाई न केल्याने महापालिका आयुक्तांसह विभागीय आयुक्तांविरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार प्यारेलाल गुप्ता यांनी औरंगाबाद खंडपीठात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मंगळवारी याचिका दाखल केल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी न्या.टी.व्ही.नलावडे यांच्या न्यायासनापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?
महानगरपालिकेतील विविध घोटाळ्याप्रकरणी 2013 साली तत्कालीन आयुक्तांनी वसुलीसाठी तत्कालीन 55 नगरसेवकांना नोटीसा बजावल्या होत्या. या निर्णयाविरुद्ध खान्देश विकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी त्यावेळी न्यायालयात धाव घेतली मात्र त्यावेळी नगरसेवकांचा अर्ज न्या.नलावडे यांनी नामंजूर केला होता तर त्रयस्त इसम दीपककुमार गुप्ता यांनी आमचे म्हणणे ऐकून घ्या म्हणून अर्ज केल्यानंतर तो न्यायालयाने मंजूर करीत आयुक्त महापालिका, जळगाव व विभागीय आयुक्त, नाशिक यांना एक कोटी 16 लाखांच्या नोटीस प्रकरणी हजर राहून दोघा पक्षांसह गुप्तांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे आदेश 21 जानेवारी 2017 रोजी पारीत केले होते. 21 जून 20017 रोजी या आदेशाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतरही उभय अधिकार्‍यांनी सुनावणी व निर्णय घेतलाच नसल्याची माहिती आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ता उल्हास साबळे यांनीही आयुक्तांना काही दिवसांपूर्वीच याबाबत नोटीस दिली होती. नगरसेवक वसुली प्रकरणात निर्णय घ्या अन्यथा अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता मात्र महापालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. दरम्यान, 7 जुलै रोजी गुप्ता यांनी आयुक्तांसह विभागीय आयुक्तांना नोटीस देऊन नगरसेवकांना नो ड्यूज देऊ नका वा नो ड्यूज देताना संबंधिताकडून एक कोटी 16 लाखांची डिपॉझिट करावी व नंतरच नो ड्यूज द्यावेत, असे सांगूनही आयुक्तांनी माहिती दिली नाही व सुनावणी न घेतल्याने त्यांनी खंडपीठात महापालिका आयुक्त व विभागीय आयुक्तांविरुद्ध मंगळवारी अवमान याचिका दाखल केल्याने महापालिकेच्या राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

दोषींवर कारवाई होईस्तोवर लढा सुरू राहणार -दीपककुमार गुप्ता
महापालिका प्रशासन व तत्कालीन नगरसेवकांची ही एक प्रकारे मिलिभगत असून तत्कालीन नगरसेवकांकडे एक कोटी 16 लाख रुपये घेणे असताना दिड वर्षांपासून अधिक काळ उलटूनही निर्णय देण्यात न आल्याने खंडपीठात अवमान याचिका आपण दाखल केली आहे. दोषींवर कारवाई होईस्तोवर आपला लढा व सामाजिक कार्य अशाच पद्धत्तीने या पुढेही सुरू राहणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.