जळगाव – हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे काय? असे विधान करणारे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडीया मजलीसए इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच एएमआयएमच्या मदतीने जळगाव महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आणला. या निमीत्ताने जळगाव महापालिकेत शिवसेना- एमआयएम या नव्या युतीच्या अध्यायाला सुरवात झाली. सन २०१८ मध्ये जळगाव महापालिकेची निवडणूक झाली. या काळात राज्यात भाजपा- शिवसेना युतीची सत्ता होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले आमदार गिरीश महाजन यांनी पालकमंत्री असतांना शिवसेना फोडुन भाजपाची महापालिकेवर एक हाती सत्ता मिळविली. सुरवातीलाच आमदार राजूमामा भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौरपदी विराजमान झाल्या. त्यानंतर कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे यांना महापौर पदाची संधी मिळाली. या अडीच वर्षाच्या काळात जळगाव महापालिकेत भाजपा विरूध्द शिवसेना आणि एमआयएम अशी राजकीय परिस्थीती राहीली. भारती सोनवणे यांचा महापौर पदाचा कार्यकाळा संपुष्टात आल्यानंतर शिवसेनेने अवघे १५ नगरसेवक असतांना सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाच्या नाराज नगरसेवकांना गळाला लावले. भाजपाच्या तब्बल २७ नगरसेवकांनी बंडखोरी करीत शिवसेनेशी हातमिळवणी केली. भाजपाप्रमाणे ओवेसींच्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना भाजपाचे बंडखोर २७ आणि एमआयएमचे तीन असे ३० नगरसेवकांचे पाठबळ मिळाले. या नगरसेवकांच्या पाठबळावर आज शिवसेनेचा जळगाव महापा लिकेवर भगवा फडकला. भाजपाचे नगरसेवक फुटणे हे फारसे आश्चर्यकारक नाही. कारण ते आधी शिवसेनेतुन फुटून आले होते. पण अमरावतीप्रमाणे जळगाव महापालिकेतही एमआयएमची शिवसेनेशी झालेली युती हा नवा अध्यायच मानला जात आहे.