जळगाव महापौर जयश्री महाजनांच्या घरावर हल्ला : 43 संशयीतांविरोधात गुन्हा

Attack on the House of Jalgaon Mayor Jayashree Mahajan : Crime against 43 Suspects जळगाव : जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री मेहरुन परीसरात रात्री पावणे अकरा वाजता घडली. कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या घरावर पेटते सुतळी बॉम्ब, गुलाल फेकला मात्र त्यास मज्जाव करण्यात आल्यानंतर दगड फेक करण्यात आल्याने तिघे जखमी झाले. पुर्वेश यशवंत महाजन (23, रा.विठ्ठल मंदिर चौक) यांच्या फिर्यादीनुसार 43 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी घडली घटना
महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या जयदुर्गा भवानी क्रिडा मंडळाचे कार्यकर्ते गणपती विसर्जन करून विठ्ठल मंदिर चौकात थांबले होते. याच चौकात महापौर महाजन यांचे घर आहे. दरम्यान, यावेळी एक गाव एक गणपती व श्रीराम मित्र मंडळ असे दोन्ही मंडळ त्या मार्गावरून विसर्जन मिरवणूक नेत होते. या मिरवणूकीतील काही तरुण महापौर महाजन यांच्या घरावर गुलाल फेकून मोठ्याने आरडा-ओरड करीत होते. एक तरुण पेटलेले फटाके महाजन यांच्या घरावर फेकत होता. या प्रकारामुळे चौकात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे पुर्वेश महाजन यांच्यासह महेश महाजन, पुष्पक महाजन यांनी गोंधळ घालणार्‍या तरुणांना हटकले.

यांच्याविरुद्ध दाखल झालाय गुन्हा
आमच्या घरात वृद्ध पेशंट आहे. त्यांचे बायपास झाले आहे. त्यामुळे तुम्ही या चौकातून पुढे जा, असे महाजन यांनी जमावाला सांगितले. याचा राग आल्यामुळे योगेश राजेंद्र नाईक, तेजस ज्ञानेश्वर वाघ, अजय संतोष सांगळे, मयुर बाळकृष्ण सांगळे, दिनेश शिवदास घुगे, किरण उर्फ उली जगदीश नाईक, तेजस उर्फ लंगड्या सुनिल घुगे, महेश शिवदास घुगे, दीपक राजेंद्र नाईक, राहुल विठ्ठल सानप, वैभव किशोर वाघ, महेश उर्फ माही लाड, रामा वासुदेव सानप, मंगेश राजेंद्र नाईक, भावेश उमेश घुगे, भरत चांगदेव आंधळे, किरण शैले, सागर विजय लाड व सोबत असलेल्या 25-30 जणांनी तुफान दगडफेक सुरू केली. काही जणांनी महिलांच्या अंगावर चाकू रोखून वार करण्याचे प्रयत्न केले.

चाकी, चारचाकींचे नुकसान, सोनसाखळी देखील लंपास
यादरम्यान अ‍ॅड.निता भरत महाजन यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी ओढून लंपास करण्यात आली तसेच दुचाकी, चारचाकींचे नुकसान केले. यानंतर गणेश मूर्ती रस्त्यावरच सोडून कार्यकर्ते पळाले. स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलिस बंदोबस्तात मूर्ती विसर्जनासाठी हलवली. या प्रकारामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत जमाव पांगवला. या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनेकांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस कर्मचार्‍यासह अधिकार्‍यांनी महापौरांचे निवासस्थान गाठले आणि घटनेची माहिती घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, गजानन मालपुरे, सरीता कोल्हे, मानसिंग सोनवने यांनी रात्रीच महापौर जयश्री महाजन यांची भेट घेत घडला प्रकार जाणला.

महापौरांचा पोलिसांवर गंभीर आरोप
या घटनेत पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला झाला असल्याचे महापौर जयश्री महाजन म्हणाल्या. जळगाव शहराच्या प्रथम नागरीकच या ठिकाणी सुरक्षित राहणार नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल ही जयश्री महाजन यांनी उपस्थित करून पोलिसांवर रोष व्यक्त केला आहे.