जळगाव जिल्हा रुग्णालयात होणार वैद्यकीय महाविद्यालयाची लॅब आणि हॉल
चाळीस लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता, मेडिकल हबच्या दृष्टीने पाऊले टाकायला सुरुवात
मुंबई (निलेश झालटे):- जळगाव येथे चिंचोली शिवारात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामास राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्यावतीने मान्यता देण्यात आली असून त्यासाठी १९१ कोटी ९० लाख २४ हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात मागील १० मे रोजी निर्णय घेण्यात आला असून निविदा प्रक्रियेनंतर बांधकामास सुरुवात होणार आहे. तसेच नव्याने सुरु होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात लेक्चर हॉल आणि क्षयरोगविभागाच्या इमारतीमध्ये शरीरक्रियाशास्त्र विभागासाठी प्रयोगशाळा बाांधकाम 40 लाख 23 हजार 753 रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास सोमवार, ४ जून रोजी मान्यता दिली आहे.
पहिला एकीकृत असलेला प्रकल्प
गेल्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणात जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा झाली आहे. भारतातला पहिला एकीकृत वैद्यकीय शैक्षणिक परिसर असा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यात अलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, दंत चिकित्सा आणि फिजिओथेरपी अशा सर्व प्रकारच्या उपचार पद्धतींची वैद्यकीय महाविद्यालये असतील. याच २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासूनच पाहिले ऍलोपॅथी महाविद्यालय सुरू होणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. सध्या प्रत्यक्षात स्वतंत्र इमारतीचे बांधकाम झालेले नसल्याने जळगाव येथील शासकीय जिल्हा नागरी रुग्णालयातच हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. नवीन वैद्यकीय शैक्षणिक परिसरातील जागेत पहिल्या इमारती बांधून होताच पुढील दोन ते तीन वर्षात हे वैद्यकीय महाविद्यालय त्या जागेत स्थलांतरितहोणार आहे. त्यामुळे या दृष्टीने कामाला वेग आला आहे.
१२०० कोटींहून अधिक खर्च!
जळगाव-जामनेर राज्य महामार्गावर चिंचोली शिवारात एकूण ११० एकर जमीन या प्रकल्पासाठी चिन्हांकित केली गेली आहे. त्यातील ३५ एकर ही अगदी राज्य महामार्गाला लागून, तर उर्वरित जमीन दुसरीकडे आहे. हा प्रकल्प एकूण बाराशे ते चौदाशे कोटींचा आहे. यातील जवळपास ११० कोटी रुपये पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात येत आहेत. पहिल्या अलोपॅथी महाविद्यालयानंतर लगेच दंत चिकित्सा महाविद्यालय सुरू केले जाईल. त्यानंतर आयुर्वेदिक आणि फिजिओथेरपी एकत्र आणि नंतर होमिओपॅथी महाविद्यालय सुरू होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण खात्यातील सूत्रांकडून मिळाली आहे.
कसा असणार आहे हा मेडिकल हब
जळगावच्या या शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) सुरू करण्यासह त्यास १२५० कोटी ६० लाख निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण तसेच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या संकुलामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय यांचा समावेश आहे.