जळगाव स्थानकावरून 28 लाखांच्या सोन्याची चोरी : दोघे आरोपी जाळ्यात

भुसावळ लोहमार्ग पोलिसांची यशस्वी कामगिरी : मुंबईहून पाळत ठेवून केली चोरी

भुसावळ : मुंबई येथून कुरीयर घेवून निघालेल्या कर्मचार्‍याचा रेल्वेतून पाठलाग करीत जळगाव स्थानक आल्यानंतर भामट्याने सुमारे 28 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याची घटना 1 फेब्रुवारी जळगाव रेल्वे स्थानकावर घडली होती. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुष्पेंद्रसिंह उर्फ पिंटू सुरेंदसिंह सिकरवार (27, रा.बावडीपुरा, तहसील सबलगड, टेंटरा, जि.मुरेना, मध्यप्रदेश) व दुर्गेश रामूसिंह सिकरवार (21, रा.बावडीपुरा, तहसील सबलगड, टेंटरा, जि.मुरेना, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींना शुक्रवारी भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जळगाव स्थानक येताच लांबवली ऐवजाची बॅग
तक्रारदार संतोष रामेता उर्फ रामहेत जाटव (27, ज्वार गेट, सराफा बाजार अमरावती) हे कुरीयर कर्मचारी असून मुंबई येथून ते अमरावतीसाठी कुरीयर घेवून 1 फेब्रुवारी रोजी डाऊन 12809 मुंबई मेल एक्सप्रेसच्या कोच क्रमांक डी- 1 वनच्या बर्थच्या 45 वरून मुंबई ते अमरावती प्रवास करीत होते. रेल्वे स्टेशन सीएसएमटी येथून एक तर दादर रेल्वे स्थानकावरून एक व तीन प्रवासी हे ठाणे स्थानकावरून प्रवासासाठी बसल्यानंतर जळगाव येण्याच्या आधी गाडीचा वेग कमी हेाताच 25 ते 26 वर्ष वयोगटातील तरुणाने जाटव यांच्या पायाखाली ठेवलेली कुरीयर कंपनीची राखाडी सॅग लांबवली. त्यात 21 लाख 26 हजार 540 रुपये किंमतीचे सोन्याचे ागिने तसेच सहा लाख 44 हजार 942 रुपये किंमतीची चांदीची लगड मिळून 27 लाख 71 हजार 482 रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पेालिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक कौशल्याचा वापरीत करीत गुन्ह्याची उकल
पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विजय घेरडे यांनी तक्रारदाराच्या संपर्कातील कुरीयर कंपनीचे कामगार व त्याचे मित्रांचे मोबाईल क्रमांक तसेच मुंबईवरून बसलेल्या प्रवाशांचे फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संशयीत पुष्पेंद्र उर्फ पिंटु याची ओळख पटवली तर हा गुन्हा करण्याकामी कुरीयर कर्मचारी दुर्गेश सिकरवार यानेही सहकार्य केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघा आरोपींच्या मुसक्या बांधण्यात आल्या.

यांनी लावला गुन्ह्याचा छडा
औरंगाबाद लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस उपअधीक्षक दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विजय घेरडे, सहा.निरीक्षक भाउसाहेब मगरे, एएसआय इंगळे, हवालदार ठाकुर, हवालदार खंडारे, हवालदार राजपूत, हवालदार शेजवलकर, हवालदार तडवी, नाईक दैवे, नाईक जैन, शिपाई मिर्झा तसेच सायबर सेल लोहमार्ग औरंगाबादचे सहा.निरीक्षक प्रेमलता जगताप, शिपाई पाटील तसेच सीआयबी आरपीएफ पनवेल येथील सहा.उपनिरीक्षक अन्वर शहा, सीआयबी आरपीएफ भुसावळ येथील सहा.उपनिरीक्षक महाजन यांनी या गुन्ह्याची उकल केली. दरम्यान, तपास पथकाला पोलिस अधीक्षकांनी दहा हजारांचे बक्षीस व प्रशस्तीपत्रक देवून कौतुक केले.