जांभळ्या आंब्यांची निर्मिती म्हणजे निसर्गात हस्तक्षेप

0

सध्या जांभूळ आणि आंबा या दोन फळांचे संयुक्त फळ निर्माण करण्यात येत आहे. हे असे करणे चुकीचे आहे. यामागे मधुमेहावर इलाज हवा असे म्हटले आहे. त्यासाठी निसर्गाने जांभूळ व इतर फळे दिली आहेत. आपण निसर्गात हस्तक्षेप करून गोड आंब्यात बदल करू नये. अशाने इतर जीवांच्या जीवनात अनिष्ट परिणाम होतो. निसर्गाचे स्वतःचे अत्यंत नाजूक, गुंतागुंतीचे व तरीही एकप्रकारे सुनियोजित व्यवस्थापन आपण मोडतो, अशा अनैसर्गिक हस्तक्षेपामुळे गोड आंबा खाणार्‍या जीवांच्या अन्नात घट होईल. यामुळे परागीभवन व फलधारणेवरही विपरीत परिणाम होतो. निसर्गात कोणते कीटक व इतर सजीव यात कोणती भूमिका करणार हे ठरलेले असते.

सध्या जांभूळ आणि आंबा या दोन फळांचे संयुक्त फळ निर्माण करण्यात येत आहे. हे असे करणे चुकीचे आहे. यामागे मधुमेहावर इलाज हवा असे म्हटले आहे. त्यासाठी निसर्गाने जांभूळ व इतर फळे दिली आहेत. आपण निसर्गात हस्तक्षेप करून गोड आंब्यात बदल करू नये, अशाने इतर जीवांच्या जीवनात अनिष्ट परिणाम होतो. निसर्गाचे स्वतःचे अत्यंत नाजूक, गुंतागुंतीचे व तरीही एकप्रकारे सुनियोजित व्यवस्थापन आपण मोडतो, अशा अनैसर्गिक हस्तक्षेपामुळे गोड आंबा खाणार्‍या जीवांच्या अन्नात घट होईल. यामुळे परागीभवन व फलधारणेवरही विपरीत परिणाम होतो. निसर्गात कोणते कीटक व इतर सजीव यात कोणती भूमिका करणार हे ठरलेले असते. मानव याबाबत अज्ञानात आहे. पृथ्वीची व्याप्ती पाहता त्याला याचे पूर्ण ज्ञान होणे शक्यही नव्हते. मात्र, याची जाणीव नसलेल्यांनी संहाराचे सत्र चालवले आहे. आधुनिक म्हणवणार्‍या माणसाला आता कारलेदेखील गोड हवेत. द्राक्ष, पपई इ. फळांतील बिया त्याने काढल्या. आता सीताफळ, रामफळ इ. फळांतील बिया त्याला बोचतात. यांनी आधी मका गोड केला. आता गोडवा काढून टाकण्यासाठी धडपडतात. बिया काढल्यामुळे नैसर्गिक पुनरुत्पादन बंद होते. बियाणे विकत घेणे अपरिहार्य ठरते. कंपन्या व व्यापार्‍यांच्या हातात सृजन जाते. बाजाराच्या अर्थव्यवस्थेची सूत्रे हाताळणारे विज्ञान तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहेत. वैज्ञानिकांनी उन्मादात न राहता याबाबत विचार करायला हवा.

या बियांची संख्या निसर्गाने विचारपूर्वक ठरवली होती. तीत बदल करायचा तर तो निसर्गाकडून उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रवासात होत होता. जुन्या माणसांना द्राक्षांच्या बिया होत्या, त्या काळातील द्राक्षांची चव, स्वाद व प्रयोगशाळांनी बिया काढणे किंवा इतर बदल केल्यानंतरची द्राक्षे, यात तुलना करता पूर्वीची द्राक्षे सरस होती हे आठवते. फळे, भाज्यांची चव, सत्व व पौष्टिकपणा यामुळे गेला. उदा. कलिंगड, अननस, टरबूज इ. गोड, कडू, आंबट, खारट तुरट इ. चवींची निसर्गनिर्मित विविधता टिकणे हेच हिताचे आहे.

तथाकथित आधुनिक माणसांना बिया काढण्याचा त्रास वाटतो. यात कसला त्रास? या सुखाच्या व सोयीच्या चुकीच्या कल्पनांमुळे औद्योगिकीकरण व शहरीकरण वाढले. निसर्गात सोडलेल्या द्रव्यांमुळे सजीवांत व्यंग, वंध्यत्व, विकृती वाढली. शेतकर्‍यांनी हजारो वर्षांत जरूर विविधता आणली. पण त्यांनी मूलभूत गुणधर्म बदलणे शक्यतो टाळले. ते त्यांचे शहाणपण होते. मात्र, आता बाजाराचा वाढता प्रभाव व अनावश्यक गरजा वाढवल्याने पैशाची ओढ, यातून चुकीच्या दिशेने पावले पडली आहेत. आधुनिक जैवतंत्रज्ञान (बीटी), जनुक तंत्रज्ञान इ. तर निसर्गावर विजय मिळवण्याच्या, त्याच्याविरुद्ध युद्ध करण्याच्या भूमिकेतून आणले असल्याने अनर्थ घडत आहे. अशा रीतीने इतर जीवजातींवर प्रयोग करण्याचा अधिकार मानवाला कुणी दिला? शिक्षितांना असे वाटते की, असे करायचे नाही तर मग आम्ही शिकलो कशासाठी? त्यांना सांगावेसे वाटते की, तुम्ही निसर्गाच्या करोडो वर्षांच्या प्रयोगशाळेमुळे जन्माला आलात, यातच धन्यता माना. शिकलात त्याचे कौतुक नको. आपण जे शिकलो ती प्रत्येक गोष्ट पृथ्वीवर प्रत्यक्षात आणू नये हे तुम्ही शिकला नाही. मधुमेह कर्करोग (कॅन्सर) व इतर आजारांची वाढ ही सुमारे साठ वर्षांपूर्वी देशात, औद्योगिकीकरण, शहरीकरण व जीडीपीच्या वाढीवर आधारित अर्थव्यवस्था दामटण्याशी जोडली आहे. ही आरोग्याला घातक असलेली चुकीची वाटचाल थांबवणे आवश्यक आहे. निसर्गात हस्तक्षेप केल्याने दुष्टचक्र अधिक वेग घेत आहे.

सध्या वातावरण टोकाचे बदल होताना दिसत आहेत. महाबळेश्‍वरला नुकतेच ऐन उन्हाळ्यात भुरभुरणारा बर्फ पडला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवसा असह्य उष्मा असताना रात्री थोड्या काळासाठी अचानक थंडी पडते, असा वेगळा अनुभव येत आहे. काही प्रसारमाध्यमे हे काहीतरी छान घडत आहे, असे रंगवत आहेत. यामुळे जनता गाफील राहत आहे. दिवसा 40 ओ.से. तापमान व रात्री बर्फवृष्टी हे अत्यंत धोकादायक आहे. प्रत्यक्षात बॉन येथील नोव्हेंबरमधील परिषदेत जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याची प्रक्रिया अपरिवर्तनीय झाली आहे. म्हणजे सध्याच्या वातावरणातील कार्बनच्या प्रमाणामुळे यापुढे तापमान वाढत राहणार आहे. औद्योगिकीकरण व शहरीकरण चालू राहिल्यास कार्बन व इतर सूर्याची उष्णता रोखून धरणार्‍या वायू व द्रव्यांचे वातावरणातील प्रमाण वाढत राहील आणि जंगल, नदी, सागरातील हरितद्रव्य नष्ट होत राहील व चालू शतकात पृथ्वीवरून मानवजात व बहुतांश जीवसृष्टी नष्ट होईल. ही काल्पनिक गोष्ट नाही.

पृथ्वीवरील पर्यावरणीय विभाग दरवर्षी सुमारे 35 मैल या अभूतपूर्व गतीने विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे सरकू लागले आहेत. पृथ्वीच्या सरासरी तापमानात प्रतिवर्षी एक पंचमांश अंश सेल्सिअसची वाढ होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. मानवजात व जीवसृष्टी वाचवण्यासाठी सर्व राष्ट्रप्रमुखांनी, यंत्र येण्याच्या म्हणजे सन 1750च्या तुलनेत सरासरी तापमानात 2 ओ सेल्सिअसची वाढ होऊ नये म्हणून केलेला ‘पॅरिस करार’ या गतीने फक्त चौथ्या वर्षी अयशस्वी ठरेल. जागतिक हवामान संघटनेने 23 मार्च 2017 च्या अहवालात हे स्पष्ट केले आहे की, ‘बदलत्या हवामानाबाबतचे त्यांचे आकलन संपले आहे व आपण अज्ञात प्रदेशात प्रवेश केला आहे.’ अमेरिकेच्या नासा, वातावरण व महासागर प्रशासन, युनोच्या, ‘वातावरण बदलाचा अभ्यास करणारा आंतरराष्ट्रीय अभ्यास गट’ आणि ‘हवाई विद्यापीठ’ अशा महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्थांचे अहवालही याच भीषण वास्तवावर शिक्कामोर्तब केले गेले आहे. एकदा वातावरणात शिरलेला ‘कार्बन डाय ऑक्साइड’ वायू तेथे 600 ते 1000 वर्षे टिकतो व तापमान वाढवत राहतो. हे सर्व एकत्र लक्षात घेतले तर ‘तत्काळ औद्योगिकीकरण, शहरीकरण बंद करणे मानवजात वाचवण्यासाठी आवश्यक आहे.’

जीवनशैली व जीवनाच्या दर्जाच्या भ्रमातून ताबडतोब बाहेर पडले पाहिजे. आपली खरी गरज पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रांप्रमाणे कोट्यवधी वर्षे फक्त हवा, पाणी व अन्न आहे.

त्यापुढची वस्त्र व निवारा ही गरज यंत्र व रसायने येण्याच्या आधीच्या काळात सुमारे पाच ते दहा हजार वर्षे ऊर्जाविरहित पद्धतीने भागवली जात होती. आपल्या मुलाबाळांच्या डोळ्यांत पाहा. इतर सजीवांची जगण्याची इच्छा पाहा आणि आपला निराशावाद, आपली आत्मसंतुष्टता त्यांच्यावर लादू नका. जीवनाची देणगी भावी पिढ्यांपासून हिरावून घेऊ नका. मुंबई न्यूयॉर्कसारख्या शहरांचे अवसान उसने आहे. पालघर डहाणूवासीयांचे, तेथील सूर्या नदीचे पाणी तेथील पिण्याच्या व शेतीच्या गरजेसाठी असून, ते विरार ते भायंदरच्या शहरीकरणासाठी गेल्याने होणार्‍या अन्यायाविरुद्ध काही दिवस उपोषण झाले. व्हेल, हत्ती, पाणघोड्यांसारख्या महाकाय प्राणिमात्रांचे पृथ्वीने करोडो वर्षे पोषण केले. पण यंत्रांची भूक पृथ्वी भागवू शकली नाही. म्हणून माणसांचे संघर्ष होत आहेत. यातील दोन्ही बाजूंना असलेल्या माणसांनी समस्येचे मूळ ओळखावे. ते औद्योगिकीकरण, शहरीकरणात आहे ते सोडावे. डहाणूतील असलेले औष्णिक वीज केंद्र बंद करावे व संकल्पित बंदर रद्द करावे. पृथ्वीशी सुसंगत अशी 250 वर्षांपूर्वीची जीवनपद्धती, त्यातील मानवनिर्मित विषमतेचे सामाजिक दोष काढून स्वीकारावी. प्रसारमाध्यमांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. आपण ‘पृथ्वीच्या क्षमतेची देणगी म्हणून अस्तित्वात आहोत.’ मानवी व्यवस्थेत मिळणार्‍या पैशामुळे नाही. औद्योगिकीकरणामुळे नाही.

अ‍ॅड. गिरीश राऊत
9869023127