जाखमाता देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

0

लोणावळा : येथील तुंगार्ली गावाची ग्रामदेवता असलेल्या जाखमाता देवीची वार्षिक यात्रा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जाखमाता देवी मंदिर ट्रस्ट आणि तुंगार्ली ग्रामस्थ यांच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या आणि दोन दिवस चाललेल्या या यात्रेदरम्यान हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी जाखमाता देवीचे दर्शन घेतले.

दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी भरणारी जाखमाता देवीची यात्रा ही मावळ तालुक्यातील काही मोठ्या यात्रांपैकी एक यात्रा असून दोन दिवस ही यात्रा सुरू राहते. यंदाचे यात्रेचे हे 157 वे वर्ष असून यावेळी यात्रेच्या दोन दिवस आधी शिवजयंती सोहळाही जोडून आल्याने यावर्षी यात्रेला चार दिवसाचे स्वरूप आले होते.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिवजयंतीच्या पहिल्या दोन दिवसात शिवजयंती उत्सव कमिटी, तुंगार्ली यांच्या वतीने शिवज्योत मिरवणूक, शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, इतिहास अभ्यासक डॉ.प्रमोद बोर्‍हाडे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान यासोबतच ’हा जल्लोष महाराष्ट्राचा’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर मुख्य यात्रेदरम्यान जाखमाता देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने पहिल्या दिवशी देवीची पालखी मिरवणूक आणि ’तुमच्यासाठी काय पण’ या लावण्यांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे तर दुसर्‍या दिवशी कुस्त्यांचा आखाडा आणि ’नटखट अप्सरा’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मंदिरपरिसरात विद्युत रोषणाई
या यात्रेसाठी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शिवाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वासाठी वेगवेगळ्या पध्दतीचे खेळ, आकाश पाळणे या यात्रेत लावण्यात आल्याने त्यांची मजा घेण्यासाठी, तसेच यात्रेची खरेदी करण्यासाठी पंचक्रोशीतील लहान मोठ्यांच्या गर्दीने गावातील सर्व रस्ते आणि मंदिराचे मैदान अक्षरशः फुलून गेले होते. यात्रेच्या दरम्यान काही अघटित घडू नये यासाठी लोणावळा शहर पोलिसांकडून गणवेशातील तसेच साध्या वेशातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.