जागतिक नेता सैरभैर होणार का?

0

युद्धाचा संघर्ष टाळण्यासाठी किम जोंग यांनी दक्षिण कोरियासह अमेरिकेशी राजकीय स्तरावरील चर्चा करण्याची सिद्धता दाखवली आहे, ही अमेरिकेच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. अमेरिकेने ही चर्चा घडवून आणण्याच्या कामी स्वारस्य दाखवले, तर दोन अण्वस्त्रधारी शक्तींमधील संघर्ष टळण्याची शक्यता आहे, पण अशी शिखर परिषद नियोजित करायची कोणी? त्यासाठीही मानापमानाचे सूत्र पुढे येऊ शकते. जागतिक युद्धाच्या दृष्टीने सध्या हे दोन देशच लोकांच्या डोळ्यांसमोर आहेत.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग अमेरिकेला धमकी देत ‘अणुबॉम्बचे बटण माझ्या पटलावर (टेबलावर) आहे’, असे म्हणाले. यास अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून ‘माझ्या पटलावरही महाशक्तिशाली अणुबॉम्बचे बटण आहे’, अशा शब्दांत जोंग यांना प्रत्युत्तर दिले. अमेरिकी अध्यक्ष आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा यांच्यातील हा संघर्ष मागील कित्येक दिवसांपासून चालू आहे. जोंग यांनी हायड्रोजन बाँबची चाचणी घेतली, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प बिथरले. त्यांचा तो उद्वेग त्यांच्या अहंकाराला पोहोचलेल्या आघातामुळे निर्माण झाला होता.

अमेरिका म्हणजे जागतिक शक्ती, अमेरिका म्हणजे महासत्ता आणि अमेरिका म्हणजे जगाचा तारणहार! अमेरिकेने स्वतःविषयी अशी समजूत करून घेतली आहे, नव्हे इतरांनी तिला तसे संबोधावे आणि आपल्याहून वरचढ कोणी होऊ नये, अशी तिच्या प्रशासनाची इच्छा असते. अध्यक्ष कोणीही असो, ‘डेमोके्रटिक’ किंवा ‘रिपब्लिकन’ देशांविषयीचा अभिमान मात्र सूतभरही कमी होत नाही. हिंदुस्थानात कधी असे होते का? सत्तांधता, स्वार्थ आणि त्यामुळे देशाला विकायचीही सिद्धता. देशातील विद्यमान स्थिती अभ्यासली, तर आणखी काही पुरावे द्यायची आवश्यकता नाही. विषयाकडे वळायचे तर परत आपण डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्याकडे पाहतो. किम जोंग यांना हुकूमशहा असे संबोधले जात आहे. ट्रम्प म्हणजे अकस्मातपणे अमेरिकी राजकारणात दिसू लागलेले व्यक्तिमत्त्व! त्यांचे निर्णय अमेरिकी जनतेलाच गोंधळात टाकणारे वाटतात. त्यांचे आंतरराष्ट्रीय निर्णय वादग्रस्त ठरतात. स्वतःचे निर्णय कालांतराने चांगले परिणाम आणतील, असा तर त्यांना विश्‍वास वाटत नसेल? किम जोंग यांनी नवीन वर्षाच्या आरंभी ‘अणुबॉम्बची कळ माझ्या पटलावर आहे’, असा चिथावणीखोर संदेश पाठवल्यावर अमेरिकेच्या शेपटीवर पाय पडल्यासारखे झाले आणि अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उतावळेपणाने प्रत्युत्तर दिले की, माझ्याही पटलावर महाशक्तिशाली बॉम्बची कळ आहे. त्यांचे हे प्रत्युत्तर सध्या चर्चेचा विषय आहे. याचे कारण असे की, ट्रम्प यांचे हे प्रत्युत्तर अगदी बालीशपणाचे वाटते. प्रत्यक्ष अमेरिकी पत्रकार ‘व्हाइट हाऊस’कडे विचारणा करत आहेत की, अध्यक्ष महाशय अणुबॉम्बसंदर्भात एवढे सहजपणे बोलत आहेत म्हणजे त्यांची मानसिक वैद्यकीय चाचणी करावी लागणार का? अर्थात त्याला उत्तर देताना व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने पलटवार करत मानसिक चाचणी किम जोंग यांचीच करायला हवी, असे उत्तर दिले. काहीही असो. विद्यमान काळातील हे दोन जागतिक नेते प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अमेरिकेचे नेतृत्व उतावळ्या स्वभावाचे आहे. त्याच्याकडे जागतिक स्वरूपाचे अनेक प्रश्‍न आहेत. उत्तर कोरियाचे सत्ताधीश किम जोंग हुकूमशहाचे काम बजावत आहेत. देशातील जनता अन्नासाठी तडफडत आहे, याकडे त्यांचे लक्ष नाही. अमेरिकेला नमवण्याची त्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे हा सत्ताधीश काय करू शकतो, हे हिटलरच्या उदाहरणावरून जगाला ठाऊक झाले आहे.

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष हुकूमशहा किम जोंग यांच्यातील संघर्ष युद्धाचा भडका उडण्यासाठी कारणीभूत होईल का? असा प्रश्‍न सध्या ठिकठिकाणी लोकांमध्ये चर्चिला जात आहे. ट्रम्प यांना स्वतःच्या देशाची प्रतिष्ठा सांभाळायची आहे, तर किम जोंग यांना अमेरिकेचे गर्वहरण करायचे आहे. कित्येक वर्षांपासून हा हुकूमशहा अणुबॉम्बच्या चाचण्या घेत आहे, अण्वस्त्रांचा साठा वाढवत आहे आणि जागतिक शक्तीची स्वप्ने पाहत आहे. प्रत्यक्ष अमेरिकाच अशी टिपणी करत असून तिला उत्तर कोरियाविषयी काळजी वाटत आहे. अमेरिकेच्या बोलण्यात एक भीती असते. हे वातावरण असेच राहावे, अशी किम जोंग यांची भूमिका आहे. अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा हेतू ते उघडपणे बोलून दाखवतात. त्याच वेळी केवळ शाब्दिक स्तरावर न राहता, प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर उतरण्याची त्यांना घाई आहे. उत्तर कोरियासमोर उपासमारीची समस्या असल्याची आठवण डोनाल्ड ट्रम्प करून देतात. त्याच वेळी अमेरिका पाकला भरघोस स्वरूपाचे आर्थिक साहाय्य देत असताना त्या साहाय्याचा पाककडून योग्य उपयोग केला गेला नसल्यामुळे पाकमध्येही दारिद्य्र होते आणि लोकांची उपासमारी होत होती. ट्रम्प यांना हे सूत्र भावल्यामुळे कदाचित त्यांनी अलीकडेच पाकला दिल्या जाणार्‍या 255 दशलक्ष डॉलरचे अर्थसाहाय्य रोखून धरले. मानवता आणि जनकल्याण ही सूत्रे ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीमध्ये प्राधान्याची असतील, तर किम जोंग त्यांना वरचढ ठरू शकतो. कारण पाकमधील दारिद्य्र आणि उपासमारी याकडे ट्रम्प यांच्याकडून लक्ष दिले जात नाही. युद्धाचा संघर्ष टाळण्यासाठी किम जोंग यांनी दक्षिण कोरियासह अमेरिकेशी राजकीय स्तरावरील चर्चा करण्याची सिद्धता दाखवली आहे, ही अमेरिकेच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. अमेरिकेने ही चर्चा घडवून आणण्याच्या कामी स्वारस्य दाखवले, तर दोन अण्वस्त्रधारी शक्तींमधील संघर्ष टळण्याची शक्यता आहे, पण अशी शिखर परिषद नियोजित करायची कोणी? त्यासाठीही मानापमानाचे सूत्र पुढे येऊ शकते. जागतिक युद्धाच्या दृष्टीने सध्या हे दोन देशच लोकांच्या डोळ्यांसमोर आहेत. ट्रम्प प्रशासनासमोर त्यांच्या अध्यक्षांच्या निर्णयांचा प्रश्‍न आहे. त्यांचे निर्णय कसेही वळण घेत असतात, अशी टीका होताना आपण पाहतो. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करण्याचा त्यांचा निर्णय सध्या वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सभेतही त्यावर मतदान घेण्यात आले. काहीही असले, तरी ट्रम्प यांना त्यांचा हा निर्णय सोपा जाईल, अशी चिन्हे नाहीत. किम जोंग यांच्याकडून येणारा दबाव आणि पाकसारख्या आतंकवादसमर्थक देशाशी असलेले मैत्रीचे संबंध यामुळे ट्रम्प प्रशासन सैरभैर झाले नाही तरच नवल!