जागतिक भौतिकोपचारदिनानिमित्त तळेगावात शिबिर सुरू 

0
माईर्स एमआयटीने राबविला उपक्रम
तळेगाव दाभाडे : जागतिक भौतिकोपचार दिनानिमित्त 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान तळेगाव दाभाडे येथील माईर्स एमआयटी पुणे संचलित माईर्स भौतिकोपचार महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने भौतिकोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान हे शिबिर चालणार असून या कालावधीमधे विविध भौतिकोपचार पद्धतीविषयी मोफत मार्गदर्शन व उपचार दिले जात आहेत. हे शिबिर तालुक्यातील विविध ठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिरा दरम्यान विविध वयोगटातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. सर्व नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ.सुचित्रा कराड नागरे व प्राचार्या डॉ.स्नेहल घोडे यांनी केले आहे.
येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण विकास प्राविण्य तपासणी विषयी मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले. महाविद्यालयाचे ग्रामीण आरोग्य केंद्र सुदुंबरे व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथे फक्त महिलांसाठी भौतिकोपचाराविषयी मार्गदर्शन, उपचार सुरू आहेत. संपूर्ण तळेगाव शहर परिसरात देखील याविषयी मार्गदर्शन व प्रबोधनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. खालुंब्रे मावळ येथे मोफत भौतिकोपचार शिबिराचे आयोजन व मार्गदर्शन पार पडले. गुरूवारी (दि.6) महाविद्यालयाच्या रुग्णालयामधे औषध वैद्यक शास्त्र विभागात हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर करण्यात येणार्‍या व्यायामाबाबत रुग्णांमधे दिसून येणार्‍या उदासिनतेविषयी रुग्णांबरोबर संवाद, चर्चा व उपचार मार्गदर्शन होणार आहे. शुक्रवारी (दि.7) संपूर्ण तळेगाव दाभाडे शहर परिसरात भौतिकोपचाराच्या महत्वाविषयी प्रबोधनपर प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. तर शनिवारी (दि.8)महाविद्यालयामधे भौतिकोपचार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.