चिंचवड ठाण्यातर्फे पोलीस मित्रांचा सत्कार
चिंचवडः प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्यावतीने ‘जागते रहो’ हा रात्रगस्त उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या 16 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरफोड्या रोखण्यासाठी समितीच्यावतीने रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत उपक्रम राबविला गेला. 7 मे ते 30 जूनच्या काळामध्ये निगडी प्राधिकरण, चिंचवड परिसरामध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात घरफोड्या रोखण्यात यश आले. पुणे शहर पोलीस परिमंडळ तीनमधील चिंचवड पोलीस ठाण्याच्यावतीने 22 पोलीस मित्रांचा प्रशस्तीपत्र देण्यात आले. विशाल शेवाळे, अमोल कानू, नितीन मांडवे, अजय घाडी, तेजस सापरिया, बाबासाहेब घाळी, मोहन भोळे, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे, संतोष चव्हाण, अमित डांगे, अमृत महाजनी, मनोज ढाके, सतीश मांडवे, अश्विन काळे, राजेश बाबर, समीर चिले, रेखा भोळे, विभावरी इंगळे, गौरी सरोदे या कार्यकर्त्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुबडे यांनी सत्कार केला.
समितीच्या पोलीस मित्र, विशेष पोलीस अधिकारी सदस्यांनी बंदोबस्त काळामध्ये पोलीस यंत्रणेस सहकार्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रात्र गुन्हेगारीस आळा बसला. समितीच्या या योगदानानिमित्त पुणे शहर पोलीस परिमंडळ तीनमधील चिंचवड पोलीस ठाण्याच्यावतीने 22 पोलीस मित्रांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुबडे, पिंपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला अध्यक्षा अर्चना घाळी, अॅड.विद्या शिंदे आदी उपस्थित होते.
रात्रगस्त काळात घरफोड्या कमी
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे म्हणाले की, प्राधिकरण सुरक्षा समिती शहरामध्ये ‘जागते रहो’ हा अतिशय स्तुत्त्य उपक्रम राबवित आहे. रात्रगस्त उपक्रम राबवित आहे. याची दखल पुणे शहर पोलीस विभागाने घेतली आहे. आजच्या तुमच्या या सन्मानाने तुमची सामाजिक कार्याची जबाबदारी वाढली आहे. रात्रगस्त काळामध्ये साखळी चोरी तसेच घरफोडयांच्या घटनांना चांगल्या प्रकारे आळा बसला. अशाच पद्धतीने नागरिकांनी सुरक्षा उपक्रमात सहभागी झाल्यास गुन्हेगारी घटनेंचा आलेख नक्कीच कमी होईल. तर समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले की, पोलीस विभागाने पोलीस मित्रांचा आज रोजी केलेल्या गौरवामुळे स्वयंसेवकांना नागरी सेवा करण्याकरिता प्रेरणा वा स्फुर्ती मिळाली आहे. चिंचवड पोलीस ठाण्याने केलेल्या सन्मानामुळे पुढेही असेच कार्य करण्याकरिता प्रोत्साहन मिळाले आहे. पालखी सोहळ्यामध्येही पोलीस मित्र वैष्णवांना तसेच पोलीस यंत्रणेला सहकार्य करणार आहेत.