जागेअभावी मेट्रो विस्तार अडचणीत

0

पुणे । स्वारगेट ते सातारा रस्त्यावर जागा मिळेल तेथे महापालिकेने उभारलेले उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांमुळे स्वारगेट ते कात्रजपर्यंत विस्तार करण्यास मेट्रोला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, या स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी-चिंचवड ते निगडी या दोन्ही मार्गावर मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासाठी महामेट्रोने आराखडा तयार करण्यास सुरुवात केली असून पुढील चार महिन्यांत हे काम पूर्ण करणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

मेट्रोमार्ग स्वारगेटपासून कात्रजपर्यंत वाढविण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी महापालिकेचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानुसार, आयुक्तांनी हे पत्र महामेट्रोला पाठवत त्यासाठीचा खर्च देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार, महामेट्रोकडून हे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यावर असलेले उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांमुळे ही मेट्रो सरळ न जाता ती महर्षि नगर आणि मार्केटयार्डाकडून पुन्हा सातारा रस्त्यावर आणण्याबाबत चाचपणी सुरू आहे.

मेट्रोसाठी कसरत
स्वारगेट येथील मेट्रो स्थानक हे जमिनीखाली सुमारे 30 मीटर असणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज हा संपूर्ण मार्ग भुयारी करणे खर्चाच्या दृष्टीने परवडणारे नाही. त्यामुळे महामेट्रोकडून स्वारगेटनंतर पुढे अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर पुन्हा जमिनीवर मेट्रो आणण्याबाबत चाचपणी सुरू आहे. मात्र, त्यासाठी पुढे सातारा रस्त्यावर जागाच नसल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर आधी बीआरटी मार्ग आहे. त्यामुळे त्या मार्गाला छेदून मेट्रो पुढे घेऊन जाणे शक्य नाही. तर अनेक ठिकाणी भुयारी मार्ग आहेत. तसेच धनकवडी येथेही उडडाणपूल झालेला आहे. त्यामुळे पुन्हा त्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी मेट्रो न्यावी लागणार आहे. त्यामुळे आराखडा तयार करताना महामेट्रोला मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

पर्यायी मार्गांची चाचपणी
मेट्रो मार्ग स्वारगेटवरून घेऊन जाणे शक्य नसल्याने महामेट्रोकडून हा मार्ग पंडित जवाहरलाल रस्ता आणि पुढे मार्केटयार्डमार्गे सातारा रस्त्यावर आणण्याबाबत चाचपणी सुरू आहे. या शिवाय, स्वारगेट येथून आगाशे महाविद्यालय मैदानाजवळ जमिनीवर येऊन पुढे मुकूंद नगर, मार्केट यार्ड मार्गे सातारा रस्ता अशा मार्गाचीही मेट्रोकडून चाचपणी सुरू आहे. मात्र, या दोन्ही मार्गावरून मेट्रो गेल्यास प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे पर्यायी मार्गांसह सातारा रस्त्याची स्थिती लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे दीक्षित यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.