जागेच्या वादातून मारहाण केलेल्या तरुणाचा मृत्यू

0

मुंबई- जागेच्या वादातून केलेल्या मारहाणीत गंभीररीत्या जखमी झालेल्या मुथ्थू पांडियन शेट्टीयार या तरुणाचा काल दुपारी उपचारादरम्यानच मृत्यू झाला. त्यामुळे दिडोंशी पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा नोंदवून याच गुन्ह्यांत चार आरोपींना अटक केली आहे. अमजद हसन सय्यद, कदीरवेल चिनलास्वामी, चित्र कन्ननकुमार वेलू आणि बाळू रामास्वामी अशी या चौघांची नावे आहेत.

अटकेनंतर या चौघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या मारहाणीत इतर तीनजण जखमी झाले होते. त्यात गणेश सुरेश मांजरेकर, महेंद्र तेवर आणि पालपांडी वासुदेवा या तिघांचा समावेश होता. मात्र त्यांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले होते. गणेश मांजरेकर हा बोरिवलीतील काजूपाडा परिसरात राहत असून तो नेहमीच गोरेगाव येथील फिल्मसिटी रोड, दांगडे कंपाऊंड परिसरात येतो. याच परिसरात तो त्याच्या मित्रांसोबत बसतो आणि तिथेच त्यांच्या गप्पा चालतात. मात्र त्यांच्या बसण्याच्या जागेवरुन तिथे असलेल्या एका तरुणांच्या टोळीमध्ये वाद सुरु होता. 26 जूनला याच वादातून सात ते आठजणांच्या एका टोळीने तिथे येऊन चौघांनाही शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. यावेळी त्यातील काही तरुणांनी मुथ्थू शेट्टीयार याच्यावर लोखंडी खुर्ची आणि रॉडने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात मुथ्थू हा गंभीररीत्या झाला होता. त्याच्यावर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा काल दुपारी एक वाजता मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र मुथ्यूच्या मृत्यूनंतर आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली. इतर पळून गेलेल्या आरोपींचा आता पोलीस शोध घेत आहेत.