जाडगाव अपघातातील दुसर्‍या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जोगलखेड्यासह कपिलवस्तू नगरात शोककळा

भुसावळ- राष्ट्रीय महामार्गावरील जाडगावजवळ दोन दुचाकी एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात पंकज जानकीराम कोळी (30, रा.जोगलखेडा) यांचा जागीच मृत्यू झाला होता तर राहुल भास्कर अहिरे (24, कपिलवस्तू नगर, भुसावळ) या गंभीर जखमीचाही शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातानंतर जोगलखेड्यासह कपिल वस्तूनगरात शोककळा पसरली आहे. राहुल अहिरे यांच्यावर शनिवारी सकाळी तर कोळी यांच्या मृतदेहावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाचीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना मामाचा मृत्यू
भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा येथील मूळ रहिवासी असलेले पंकज जानकीराम कोळी (30, रा.जोगलखेडा) हे भाचीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी मित्र राकेश त्र्यंबक धनगरसोबत दुचाकीने निघाले असताना राहुल भास्कर अहिरे (24, कपिलवस्तू नगर, भुसावळ) हे मित्र आनंद सोपान गायकवाड (22) व नागेश भीमराव बोदडे (28) यांच्यासोबत घराचा सामान आणण्यासाठी वरणगावकडे दुचाकीने निघाले असताना दोघे भरधाव दुचाकी (क्र.एम.एच.19 बी. एक्स् 6927) तसेच (क्र.एम एच. 19 बी.एल) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने पाचही जण रस्त्याच्या कडेला फेकले गेले तर त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने पंकज कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चारही जखमींवर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना राहुल अहिरे यांचा रात्री नऊ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. अहिरे हे दीपनगरात मजूर म्हणून कामाला असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी सकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जोगलखेड्यात शोककळा
रावेर तालुक्यातील सोनोदा येथील ग्रामसेविका सरला कोळी यांचे मयत पंकज कोळी हे पती असून त्यांचे साकेगाव येथे कृषी केंद्र आहे. 7 रोजी त्यांच्या भाचीचे लग्न असल्याने ते लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघाले असताना अपघात झाल्याचे सांगण्यात आले. वरणगावात त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मूळ गावी शनिवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. या घटनेने कपिलवस्तूनगरसह जोगलखेडा येथे शोककळा पसरली आहे.