जातीनिहाय आरक्षण ही समाजाला लागलेली कीड

0

पुणे । जात ही मानवनिर्मित आहे. ईश्‍वराने तर केवळ माणूस घडविला आहे. परंतु, आज राजकारण्यांनी जातीयवाद राजकीय फायद्यासाठी वापरला आहे. देशभरात विविध जाती आरक्षण मागत आहेत. रस्त्यावर उतरत आहेत. जातीवर आधारित आरक्षण मागणे ही आज भारतीय समाजाला जडलेली कीड आहे. यावर उपचार करावयाचे असतील, तर आपण मनातील जातीयवादाची विकृती हद्दपार केली पाहिजे. आर्थिक स्तरावर आधारित आरक्षणाचा विचार केला पाहिजे अर्थात आंतरजातीय विवाहांनासुद्धा प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक डॉ. वेदप्रताप वैदिक यांनी केले.

एमआयटी परिसरात आयोजित आठव्या भारतीय छात्र संसदेच्या तिसर्‍या सत्रात ‘भारतीय लोकशाहीतील जातीयवाद : समस्या की संधी’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी असित कुमार मोदी, के. स्वामी गौड, आचार्य पुंडरीक गोस्वामी, डॉ. विश्‍वनाथ कराड, प्रा. राहुल कराड, विद्यार्थी प्रतिनिधी आलोक रंजन तिवारी, प्रियांका मारवाह, ओंकार कुंवर, स्कंद बाजपेयी, प्रवीणकुमार जैसवाल उपस्थित होते. यावेळी अरुणाचल प्रदेशातील भाजपचे आमदार पानी ताराम यांना ‘आदर्श युवा विधायक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

जातीयवादाला विरोध होता
डॉ. वैदिक म्हणाले, जातीला राजकारण्यांनी ‘ब्रह्मास्त्र’ म्हणून वापरले आहे. याच आधारावर सरकार बनवले जात आहे. आरक्षणाच्या नावावर समाजाची माथी भडकावून समाज विभागला जात आहे. हे सगळे थांबवण्यासाठी जातीवाचक आडनाव वगळले पाहिजे. ज्यातून जात दिसणार नाहीत, अशी नावे ठेवली पाहिजेत. महात्मा गांधींनी जात हटवली होती. मात्र, मनमोहन सिंग सरकारने 2010मध्ये जातीनिहाय जनगणना लागू केली, हे अयोग्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीयवादाला विरोध केला होता. ‘हरिजन’ शब्द त्यांनी कधीच वापरला नाही.