बंधुता या संकेतस्थळाचे लोकार्पण कार्यक्रम
नवी सांगवी : अलीकडच्या काळात राष्ट्रीय विचारांपेक्षा जात्यांध आणि धर्मांध विचारांना अधिक महत्व आल्याचे दिसून येते. हे राष्ट्रीय एकात्मतेला घातक आहे. त्यामुळे एकात्म भारतीय समाजाच्या अक्षरश: चिंधड्या होत आहेत. त्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संवैधानिक मूल्ये समाजाच्या अंतरंगात खोलवर रुजविण्याची आवश्यकता आहे. महापुरुषांना जातीच्या कप्प्यात बंदीस्त करुन पुरोगामी विचारांची लढाई लढणे उचित नव्हे. हा सपशेल खोटारडेपणा आहे. त्यांच्या प्रगतशील विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने बंधुताचे कार्य खरोखरच महान आहे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि सुरुन इंफोकोअर सिस्टिम या संस्थांच्यावतीने येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सबनीस यांच्या हस्ते (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.बंधुता.कॉम) या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार होते. यावेळी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश जवळकर, मधुश्री ओव्हाळ, महेंद्र भारती, सुनील यादव, सर्वेश सोनवणे उपस्थित होते.
कृतीशिल बंधूतेचा आचारव्यूह
प्रकाश रोकडे म्हणाले की, कृतिशील बंधुतेचा आचारव्यूह आणि विचारव्यूह म्हणजे हे संकेतस्थळ आहे. गेल्या तीस वर्षांपासून केलेल्या कार्याचे हे संचित आहे. ते अर्जित करण्यासाठी सर्वच आघाड्यांवर संघर्ष करावा लागला. समाजाने दाखविलेल्या विश्वासाच्या बळावरच 19 राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलने, 12 विचारवेध संमेलने, पाच विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलने तसेच इतर विविधांगी उपक्रम घेणे शक्य झाले. या संपूर्ण कार्याची ऐतिहासिक नोंद म्हणजे हा दस्तऐवज आहे. तो भावी पिढीला निश्चितच दिशादर्शक ठरेल. प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश जवळकर यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले. सर्वेश सोनवणे आणि सुनील यादव यांनी संयोजन केले.