जात, धर्म न पाहता स्वराज्यातून करावे सुराज्य निर्माण

0

सिने अभिनेते राहुल सोलापूरकर ; रावेरला रंगपंचमी व्याख्यानमालेचा समारोप

रावेर- स्वातंत्र्यपूर्व काळात युवक जात, धर्म न पाहता इंग्रजांविरुद्ध लढले म्हणून स्वातंत्र्य मिळाले, आजच्या युवकांनी त्याच मार्गावर चालून स्वराज्याचे सुराज्य निर्माण करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी येथे व्यक्त केले. येथील रंगपंचमी व्याख्यानमालेचे पाचवे आणि अखेरचे पुष्प ‘दिशा स्वातंत्र्यवीरांची आणि दशा आजच्या युवकांची’ या विषयावर त्यांनी गुंफले. सरदार जी.जी.हायस्कूलच्या अग्रवाल रंगमंचावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.

देशाचा इतिहास प्रामाणिकपणे न शिकल्याने युवकांची ही दशा
सोलापूरकर पुढे म्हणाले की, आज घरात पुस्तके नाहीत, असतील तर ती शोकेसमध्ये असतात, देशाचा इतिहास प्रामाणिकपणे मांडला आणि शिकविला गेला नाही म्हणून युवकांची अशी दशा झाल्याचे ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे जो वेळ वाचतो तो सत्कारणी लागत नाही, पुस्तक वाचनात वेळ जात नाही तर टीव्हीच्या निरर्थक मालिका पाहण्यात जातो याबाबत त्यांनीखंत व्यक्त केली. आपणच केलेली घाण स्वच्छ करण्यासाठी अभियान राबविले जाते आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात हे चित्र बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आजचा युवक स्वातंत्र्यपूर्व काळातील पूर्वज, संस्कार, आपले विचार आणि स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान विसरलो, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. सुरवातीला सोलापूरकर, मोतीलाल खटवाणी, व्याख्यान मालेचे विश्वस्त दिलीप वैद्य, अध्यक्ष सचिन जाधव यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. हेमेंद्र नगरीया आणि प्रा.व्ही.व्ही.पाटील यांनी सूत्रसंचालन तर सचिव विठोबा पाटील यांनी प्रास्ताविक करून वक्त्यांचा परीचय दिला. सूत्रसंचालन पुष्कराज मिसर तर प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील यांनी आभार मानले.