जात प्रमाणपत्राचा फटका : भाजप नगरसेविका अनिता सोनवणे अखेर अपात्र

0

भुसावळ : मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने भुसावळातील भाजपा नगरसेविका अनिता एकनाथ सोनवणे यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र केल्याने भुसावळातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी या प्रकरणी तक्रार केली होती.

जात प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाई
पालिकेच्या 2016 मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात अ मधील अनुसूचीत जमाती महिला राखीव जागेवरुन अनिता एकनाथ सोनवणे हे या निवडून आल्या होत्या मात्र त्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने केदारनाथ सानप यांनी तक्रार केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी हे उपविभागीय अधिकारी यांनी छाननीत चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे अर्ज स्विकृत केल्याने त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी स्वतंत्र, निपक्ष वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत चौकशी करावी, अशी रीट पीटीशन तक्रारदार तथा माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून औरंगाबाद खंडपीठात दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे या सर्व प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी झाली. या सुनावणीत नगरसेविका सोनवणे यांनी जात प्रमाणपत्र सादर न केल्याचे आढळून आले. यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी 18 जून रोजी सोनवणे यांना अपात्र ठरवल्याबात आदेश काढले. दरम्यान, प्रांतांविषयी तक्रारीची उपजिल्हाधिकारी जळगाव, आस्थापना शाखा यांच्याकडे चौकशी होणार आहे.

मंत्रालयात दाद मागणार
जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात मंत्रालयात दाद मागण्यात येईल व निश्‍चित न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया अनिता एकनाथ सोनवणे यांनी व्यक्त केली.