पुणे । बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे एका बंद वाड्यात गुप्तधनासाठी अघोरी पूजा सुरू असताना येथील ग्रामस्थांनी काही लोकांना मांत्रिकासह रंगेहाथ पकडले. ही पूजा नरबळी देण्यासाठी होती का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत असून पोलिसांनी मात्र अशा गंभीर प्रश्नाकडेही दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. अघोरी पूजा करण्याच्या तयारीत असलेल्या मांत्रिकासह 5 जणांना गावकर्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, पोलिसांनी कारवाई न करताच हे प्रकरण मिटवल्याने शंका उपस्थित केली जात आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात लहान मुले पळविणारी टोळी आली असल्याची चर्चा आहे. असे असूनही पोलिसांनी हे प्रकरण मिटवण्याची घाई केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून याप्रकरणी राज्याच्या गृहखात्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.
5 जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले
शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कर्हावागज येथील पुलाच्या बाजूला एक कार संशयास्पद उभी असल्याचे गावातली युवकांना दिसली. त्यानंतर मुले पळवण्याची भीती असलेल्या गावकर्यांनी या गाडीत नेमक कोण आहे, याबाबतची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना त्या गाडीत बुवाबाजी करणारा मांत्रिक असल्याचे दिसून आले. मात्र, गाडीतल्या लोकांना संशय आल्याने त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर त्या तरुणांनी या परिसराचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर ते सर्वजण अंजनगावातल्या चार वर्षापासून बंद असलेल्या एका राजकारण्याच्या वाड्यासमोर मोटारसायकलसह उभे असल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी वाड्यात प्रवेश केल्यावर मांत्रिक आणि त्याचे दोन साथीदार आढळले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी संशयास्पद उत्तरे दिली. त्यामुळे 5 जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पूजा गुप्तधन मिळविण्यासाठी, की नरबळी देण्यासाठी करण्यात येणार होती? याची चौकशी पोलिसांनी करणे अपेक्षित होते. मात्र, रविवारी या संशयितांना सोडून देण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये तसेच अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत काळे यांनी घटनास्थळी संशयास्पद काहीच नव्हते असे कारण सांगून त्यांनी कारवाई करण्याचे टाळल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.