चिंचवड : लहान भावाला का मारले, असा जाब विचारणार्या मोठ्या भावाच्या शरीरावर ठिकठिकाणी ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री नऊच्या सुमारास चिंचवडमधील दळवीनगर येथे घडली. निलेश भारत कुदळे (वय 17, दळवीनगर, चिंचवड) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अरविंद शिंदे, अशोक शिंदे, सचिन शिंदे आणि अक्षय वायकर (सर्व रा. दळवीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहान भावाला मारल्याचा राग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी आरोपी अरविंद याने निलेशच्या लहान भावाला मारहाण करून ब्लेडने वार केले होते. या भांडणाचा जाब विचारण्यासाठी निलेश रविवारी रात्री दळवीनगर, रेल्वेमार्गाजवळ अरविंद याला भेटला. त्यावेळी त्याच्यासोबत सचिन, अशोक आणि अक्षय होते. निलेशने लहान भावाला का मारले असे अरविंदला विचारले असता, सर्वांनी मिळून निलेशला मारहाण केली. तसेच अरविंदने निलेशच्या पाठीवर, दंडावर आणि खांद्यावर ब्लेडने वार केले. यामध्ये निलेश गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सोडनवर तपास करीत आहेत.