जामकुंड धरणाची संरक्षण भिंत दुरूस्तीची मागणी

0

सोयगाव । तालुक्यातील वाडी(सुतांडा) येथील जामकुंड धरणाची संरक्षण भिंत गेल्या बारा वर्षापासून फुटलेल्या अवस्थेत असल्याने धरणातील जेमतेम असलेले पाणी भिंतीतून वाहून जात असल्याने या धरणातील पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे वाडीसह पळाशी, पळाशीतांडा आदि गावांना पावसाळ्यातच तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. वाडी(सुतांडा) ता.सोयगाव येथील जामकुंड धरणाची संरक्षण भिंत 2005 मध्ये फुटली होती. तब्बल एका तपानंतरही या धरणाच्या भिंतीचे दुरुस्तीचे काम न केल्याने बारा वर्षापासून या धरणातील साचलेले पाणी वाहून जात आहे. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे या भिंतीला दुरुस्तीसाठी वेळ नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. 2005 या वर्षात झालेल्या अतिवृष्टीत या धरणाच्या भिंतीला तडे जावून भिंत फुटली होती.

भिंत फुटल्याने पावसात धरण अजूनही कोरडेच
या घटनेत अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनी वाहूनही गेल्या होत्या. या शेतकर्‍यांना नुकसानीचा मावेजा तर दूरच परंतु तब्बल एका तपानंतरही या भिंतीचे दुरुस्तीचे काम हाती घेतलेले नसल्याने बारा वर्षापासून या धरणातील पाणी वाहून जात असल्याने पावसाळ्यातच हे धारण कोरडेठाक होत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे वाडी, पळाशी, पळाशीतांडा या तीन गावातील नागरिकांना बारा वर्षापासून जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह,तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी झालेला कमी स्वरूपाच्या पावसात मृतावस्थेत असलेल्या या धरणात जेमतेम पाणी साचले आहे. परंतु दुरुस्तीअभावी या धरणातील पाणी साचून राहत नाही. आगामी काळात जोरदार पावूस झाल्यास या धरणाच्या काठावर वसलेल्या गावांसह शेतीशिवाराला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तडा जावून फुटलेल्या संरक्षण भिंतीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी उपसरपंच सर्जेराव जंजाळ, संजय बोरसे, दीपक जाधव, बंडू गवळी, जयदीप बोरसे, गबा बोरसे आदींनी केली आहे.