जामदाररोड रहिवाशांच्या उपोषणाचा 34 वा दिवस

0

बारामती । बारामती नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या उपोषणाचा आज 34 वा दिवस आहे. शहरात आजपर्यंत सर्वात जास्त काळ सुरू असलेले हे उपोषण आहे. जामदाररोड येथील रस्त्याचे काम व गटार योजना या महत्त्वाच्या कामांच्या पुर्ततेसाठी हे उपोषण सुरू आहे. नगरपालिका प्रशासन व पदाधिकार्‍यांनी नुसती आश्‍वासने आतापर्यंत दिली. परंतु काम मात्र रखडले आहे. त्यामुळे जोपर्यंत काम सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार, अशी भुमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

सोमवारी (दि.28) या कामासंबंधीची निविदा नगरपालिकेत उघडली जाणार आहे. ही निविदा उघडल्यानंतर काम कोणत्या ठेकेदारांना मिळते आहे. याकडेही लक्ष लागले आहे. या निविदा उघडल्यानंतर उपोषण मागे घेतले जाईल, असे सांगितले जात आहे. या उपोषणा दरम्यान भाजपामध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाने या उपोषणास पाठिंबा देऊन सहभाग घेतला आहे. तर दुसरा गट उपोषणाच्या ठिकाणी फिरकला देखील नाही. याचा फायदाही नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांना मिळाला आहे. उपोषणास सर्वसामान्य नागरिकांनी मात्र चांगला पाठिंबा दिला. गेली 15 वर्षे जामदार रोड या भागात नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी नाराज आहेत. याच निर्धाराने नागरिकांनी उपोषणास पाठिंबा दिला. आता लवकरच काम सुरू होईल, अशी आशा येथील रहिवाशी बाळगून आहेत.